दोन दिवसांच्या पावसाने पालेभाज्या खाऊ लागल्या भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 04:12 AM2021-07-19T04:12:56+5:302021-07-19T04:12:56+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : गेल्या आठवड्यात पावसाअभावी आवक चांगली असलेल्या पालेभाज्या या आठवड्यात झालेल्या दोन दिवसांच्या पावसानंतर पुन्हा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : गेल्या आठवड्यात पावसाअभावी आवक चांगली असलेल्या पालेभाज्या या आठवड्यात झालेल्या दोन दिवसांच्या पावसानंतर पुन्हा वधारल्या आहेत. हिरव्या पालेभाज्यांसह टोमॅटोही भाव वधारले असून किराणा साहित्यासह खाद्यतेल या आठवड्यात स्थिर राहिले.
पाऊस नसल्याने सर्वांनीच चिंता वाढली असताना पालेभाज्यांसह सर्वच भाज्यांची आवक वाढल्याने गेल्या आठवड्यात त्यांचे भाव कमी झाले होते. मात्र, या आठवड्यात मंगळवारी व गुरुवारी जोरदार पाऊस झाला व त्याचा भाजीपाल्याच्या आवकवर परिणाम झाला. त्यामुळे गेल्या आठवड्यात कमी झालेले भाव पुन्हा वाढले आहेत. दुसरीकडे खाद्यतेलाचा सध्या दिलासा असून गेल्या आठवड्यात कमी झालेेले भाव अजूनही स्थिर आहेत. यामध्ये सोयाबीन तेल १४६, शेंगदाणा तेल- १७०, सूर्यफूल तेल १५५, पाम तेल १२६ रुपये प्रति किलोवर आहे. तेलासह इतर किराणा साहित्याचेही भाव स्थिर आहेत.
ग्राहकांची प्रतीक्षा
कोरोना संसर्ग कमी होत नाही तोच डेल्टा प्लसच्या संसर्गामुळे निर्बंध घालण्यात आल्याने त्याचा व्यवसायावर मोठा परिणाम होत असल्याचे व्यावसायिकांचे म्हणणे आहे. यामध्ये किराणा दुकान, भाजीपाला विक्री यांना दुपारी ४ वाजेपर्यंतच परवानगी असल्याने पाहिजे तसा व्यवसाय होत नसून ग्राहकी वाढण्याची प्रतीक्षा असल्याचे सांगितले जात आहे. ग्राहकी कमी असल्याने किराणा साहित्याचे भावदेखील स्थिर आहेत. यामध्ये बेसन पीठ ८० ते ९० रुपये प्रतिकिलोवर कायम आहे. साखर ३६ रुपये प्रतिकिलोवर स्थिर असून रवा ३५ ते ४० रुपये तर मैदा ३५ ते ३८ रुपये प्रतिकिलोवर व इतरही किराणा मालाचे भाव स्थिर आहेत.
कोथिंबीर पुन्हा वधारली
पावसाचा हिरव्या पालेभाज्यांवर परिणाम झाल्याने कोथिंबीर, मेथी, पालक यांचे भाव वाढले आहेत. यामध्ये ५० रुपयांवर असलेली मेथी पुन्हा ७० रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे. कोथिंबीरचे भावदेखील ७० ते ८० रुपये प्रति किलोवर तर पालक ५० रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे.
टोमॅटोत पुन्हा भाववाढ
गेल्या काही दिवसांपासून कमी झालेल्या टोमॅटोचे भाव पुन्हा वाढून ते ३५ ते ४० रुपये प्रति किलोवर पोहोचले आहेत. लिंबूचे ३० रुपये प्रति किलोवर असून या सोबतच बटाट्याचे भाव २० रुपये प्रति किलो तर कांद्याचे भाव अजूनही ३० रुपये प्रति किलोवर आहे. लसण १५० ते २०० रुपयांवर आहे.
भाजीपाल्याचे भाव पुन्हा वाढल्याने दैनंदिन भाजीपाला खरेदीचे बजेट वाढले आहे. किराणा साहित्य, खाद्यतेलाचेही भाव कमी असल्याने काहीसा दिलासा आहे.
- समाधान बाविस्कर, ग्राहक
खाद्यतेलासह इतर किराणा साहित्याचे भाव स्थिर आहे. निर्बंधामुळे व्यवसायावर मोठा परिणाम होत असून ग्राहकी वाढण्याची प्रतीक्षा आहे.
- रमेश चौधरी, व्यापारी
पाऊस झाल्याने त्याचा परिणाम आवकवर होऊन पालेभाज्यांचे भाव वाढले आहेत. टोमॅटोचेही भाव वाढले असून कांदे, बटाटे स्थिर आहेत.
- अर्जुन तायडे, भाजीपाला विक्रेते