विमानतळावरील दोन तासांच्या पडताळणीनंतर २५ शववाहिकेतून मृतदेह रवाना
By विलास बारी | Updated: August 24, 2024 22:50 IST2024-08-24T22:50:19+5:302024-08-24T22:50:49+5:30
नेपाळातील अपघात प्रकरण : जळगावात दाखल झाले रात्री सव्वासात वाजता विमान

विमानतळावरील दोन तासांच्या पडताळणीनंतर २५ शववाहिकेतून मृतदेह रवाना
जळगाव : नेपाळमधील गण्डकी प्रांतातील तनहुँ जिल्ह्यातील मार्स्यांगडी नदीत भाविकांची बस कोसळल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली. या घटनेतील मृतांचे मृतदेह विशेष विमानाने रात्री सव्वासात वाजेच्या सुमारास जळगावात दाखल झाले. तब्बल दोन तासांच्या तपासणीनंतर २५ शववाहिकांमधून मृतदेह अंत्यसंस्कारासाठी वरणगावसह सुसरी, पिंपळगाव खुर्द, गोळेगाव, तळवेल, आचेगाव या गावांकडे रवाना झाले.
भाविकांच्या बसला झालेल्या अपघातानंतर मृतांचे मृतदेह जळगावात आणण्यासाठी शनिवारी दिवसभर हालचाली सुरू होत्या. केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या कार्यालयाशी संपर्क केला. आंतरराष्ट्रीय सेवेचे विमान जळगावात उतरवता येणे शक्य नसल्याचे स्पष्ट केले. दरम्यान, काठमांडूत भारतीय संरक्षण खात्याचे विमान उतरविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थेट संपर्क साधला. त्यानुसार काठमांडूहून मृतदेह घेऊन निघणाऱ्या गृह मंत्रालयाच्या विमानाला जळगावात उतरविण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला.
अमित शाह यांनी तातडीने त्या प्रस्तावाला मंजुरी दिली. त्यानंतर काठमांडूहून संरक्षण दलाचे विशेष विमान थेट मृतदेहांना घेऊन रात्री सव्वासात वाजता जळगाव विमानतळावर दाखल झाले. यादरम्यान चौकशी व पळताळणी करून तब्बल दोन तासांनंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले. यावेळी विमानतळावर ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील, केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, आमदार संजय सावकारे, विभागीय आयुक्त डाॅ. प्रवीण गेडाम यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.