अनलॉकनंतर भाजीपाला २५ टक्क्यांनी महागला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:12 AM2021-06-22T04:12:27+5:302021-06-22T04:12:27+5:30
गृहिणींचे आर्थिक बजेट कोलमडले : स्वयंपाकघरात विविध प्रकारच्या डाळींचा वापर वाढला लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : गेल्या आठवड्यापासून सर्वत्र ...
गृहिणींचे आर्थिक बजेट कोलमडले : स्वयंपाकघरात विविध प्रकारच्या डाळींचा वापर वाढला
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : गेल्या आठवड्यापासून सर्वत्र अनलॉक झाल्यानंतर, नागरिक मोठ्या संख्येने खरेदीसाठी बाहेर पडत आहेत. परिणामी, मागणी जास्त वाढल्यामुळे, बाजारपेठेत सध्या भाजीपाल्याचे दर गगनाला भिडले आहेत. मागणी जास्त व पुरवठा कमी अशा प्रकारची स्थिती असल्यामुळे बाजारपेेठेत सर्व प्रकारच्या भाज्यांचे दर २५ टक्क्यांनी वाढले आहेत. त्यात कांद्याचे दर किलो दहा रुपयांनी तर गवार प्रतिकिलो ५ रुपयांनी महाग झाली आहे. महागाईमुळे भाज्या सर्वसामान्यांना परवडत नसल्यामुळे, गृहिणींनी मूग, तूर, चवळी आदी डाळींचा वापर वाढविला आहे.
लॉकडाऊनच्या काळात सर्व पालेभाज्यांचे भाव स्थिर होते; मात्र ७ जूनपासून शासनाने सर्वत्र अनलॉक केल्यानंतर सर्व प्रकारच्या बाजारपेठा, उद्योग-व्यवसाय व हॉटेलही सुरू झाले आहे. त्यामुळे नागरिकांची बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी होत आहे, तसेच दुसरीकडे शेतकरी बांधव आता हंगामी पिकांची लागवड करत असल्यामुळे, उन्हाळी भाज्यांचे प्रमाणही कमी झाले आहे. त्यामुळे बाजारपेठेत सर्व प्रकारच्या पालेभाज्यांची आवक कमी झाली आहे. त्यामुळे भाज्यांचे दर वाढले आहेत. अनलॉकपूर्वी २० ते ३० रुपये किलोपर्यंत असलेल्या भाज्या आता ४० ते ५० रुपये किलोपर्यंत पोहोचल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या घरातून पालेभाज्या गायब झाल्या आहेत. त्यामुळे याचा वापर टाळून आता स्वयंपाकघरात डाळींचा वापर वाढला आहे. दरम्यान, किमान १० ते १५ दिवस भाज्यांचे दर हे कमी होणार नसल्याचे भाजीपाला विक्रेत्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
इन्फो :
भाजीपाल्यांचे दर (प्रति किलो)
भाजीपाला १ जून २१ जून
१) कांदे २० रुपये ३० रुपये
२) बटाटे १५ रुपये ३० रुपये
३) चवळी ४० रुपये ५० रुपये
४) गिलके ४० रुपये ६० रुपये
५) गवार ४० रुपये ५० रुपये
६) भेंडी ४० रुपये ५० रुपये
७) मिरची ४० रुपये ६० रुपये