बिडगावसह धानोरा परिसरात पुन्हा १६ तास बत्ती गुल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2019 09:51 PM2019-09-02T21:51:13+5:302019-09-02T21:51:19+5:30
बिडगाव, ता.चोपडा : बिडगावसह धानोरा परिसरात विजेची समस्या अद्याप कायम आहे. रविवारी रात्री आठ वाजेला पाऊस सुरू होताच नेहमीप्रमाणे ...
बिडगाव, ता.चोपडा : बिडगावसह धानोरा परिसरात विजेची समस्या अद्याप कायम आहे. रविवारी रात्री आठ वाजेला पाऊस सुरू होताच नेहमीप्रमाणे परिसरातील वीजपुरवठा बंद झाला. त्यामुळे तब्बल डझनभरापेक्षा जास्त गावे सोमवार दुपारी १२ वाजेपर्यंत अंधारात होती.
बिडगाव-धानोरासह परिसरात वारंवार गायब होणाऱ्या विजेने ग्रामस्थ हैराण झाले आहेत. ही समस्या आता नित्याची झाली आहे. मात्र वीजमंडळ कार्यालय याकडे गांभीर्याने लक्ष देताना दिसत नाही. धानोरासह परिसरातील बिडगाव, मोहरद, वरगव्हान, खर्डी, पंचक, लोणी, मितावली, पुणगाव, पारगाव, देवगाव, कुंड्यापाणी, शेवरे, चांदण्यातलाव आदी गावांना धानोरा येथील विजवितरणच्या कार्यालयातुन विजपुरवठा होतो. मात्र थोडेही वादळ किंवा पाऊस आला तरी धानोरासह परिसरातील वीज वारंवार गायब होते. रविवारी रात्रीही परिसरात पाऊस झाला व नेहमीप्रमाणे वीज गायब झाली. चोपड्याहून धानोरा सबस्टेशनला जोडणाºया पुरवठ्यावर बिघाड झाला व तो सोमवारी सकाळी बारा वाजेलाच सुरूळीत झाला. त्यामुळे पाऊस सुरू असतानाही तब्बल १६ तास गावे अंधारात होती. याबाबत रात्रीच ‘लोकमत’च्या प्रतिनिधीसह अनेक गावांचे सरपंच, ग्राम पंचायत सदस्य यांनी चोपडा येथील विजवितरणचे उपअभियंता मेघश्याम सावकारे यांना फोनद्वारे संपर्क केला. रात्री उशिरापर्यंत बिघाड सापडला नसल्याचे सांगत सकाळीच लवकर तो सुरळीत करणार असल्याचे त्यांनी कळवले होते. मात्र दुसºया दिवशी बारा वाजेला वीजपुरवठा सुरळीत झाला.
सोळा तास बंद असलेल्या पुरवठ्यामुळे पाणी पुरवठाही झाला नाही. तसेच ग्रामस्थ शेतकरी, छोटे व्यावसायिक हैराण झाले. केवळ पावसामुळेच नाही इतर वेळीही वारंवार होणाºया या प्रकारावर नियंत्रण आणावे यासाठी लोकप्रतिनिधी तसेच परिसरातील ग्रामस्थांकडून ठोस पाठपुराव्याची मागणी होत आहे.