पुन्हा नटसम्राट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2018 12:35 AM2018-12-09T00:35:38+5:302018-12-09T00:35:55+5:30
‘लोकमत’च्या ‘मंथन पुरवणी’त ‘वेध नाटकाचा’ या सदरात लिहिताहेत रंगकर्मी डॉ.हेमंत कुलकर्णी...
आपल्या सर्वसामान्य जगण्यात काही गोष्टी अशा असतात की ज्यांचे पुनर्अनुभव हे सतत हवेहवेसे वाटत असतात. एखाद्या वस्तूचा वापर असो, एखादा खाद्यपदार्थ असो की एखादं गाणं असो.. ते पुन्हा पुन्हा अनुभवावं असं वाटतं. त्याचा कंटाळा नाही येत. त्याची गोडी ही अवीट असते आणि अशा काही गोष्टी, घटना, अनुभव, कलाकृती हे जगणं सुसह्य करीत असतात.
साधारणत: सत्तरीच्या दशकात मराठी रंगभूमीवर एक अद्भुत आविष्कार झाला आणि तो इतका प्रभावी ठरला की मराठी रंगभूमीच्या प्रेक्षकांवर आजही गारूड करीत आहे आणि तो आविष्कार म्हणजे नटसम्राट. हे नाटक. कै.वि.वा.शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज यांच्या दिव्य प्रतिभेचा तो एक उत्तुंग अविष्कार आहे. या नाटकाने मराठी रंगभूमीवर एक ऊर्जा निर्माण केली. सुरुवातीला जेव्हा हे नाटक रंगभूमीवर आले तेव्हा या नाटकातील प्रमुख भूमिका म्हणजेच अप्पासाहेब बेलवलकरांची म्हणजे नटसम्राटाची भूमिका ही मराठी रंगभूमीतील ज्येष्ठ कलावंत डॉ.श्रीराम लागू यांनी साकारली व ती खऱ्या अर्थाने अजरामर केली. या भूमिकेला डॉक्टरांनी एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले, तर या नाटकाने डॉक्टरांना प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली.
नाटक चालतंय म्हटल्यावर त्याचे शेकड्याने प्रयोग झालेत आणखी होऊ पाहात होते. पण डॉक्टरांचा नेहमीप्रमाणे संयमीत स्वभाव आडवा आला आणि त्यांनी याचे प्रयोग थांबवले. त्यांनी प्रयोग करणे थांबवले पण नाटक थोडीच थांबणारे होते. त्यांच्या पाठोपाठ नटश्रेष्ठ दत्ता भट यांनी त्या भूमिकेचे शिवधनुष्य लीलया पेलले आणि मग एक अहमहमिकाच लागली. मराठी रंगभूमीवरील अनेक ज्येष्ठ नटांनी या नाटकाचे आव्हान पेलले व ते आपापल्या वकूबानुसार सिद्ध करून दाखवले.
हे नाटक म्हणजे असंख्य पैलू असलेला लखलखीत हिरा आहे, असे म्हटले तर अतिशोयोक्ती होणार नाही. एखादी कलाकृती प्रेक्षकांना भावते ती त्यातील कंटेंटमुळे. त्यातील गर्र्भित अर्थामुळे. नटसम्राट हे नाटक व्यक्तिपरत्वे अर्थाचे पैलू प्रकट करते. कोणाला ते वृद्धांची शोकांतिका वाटते तर कोणाला कलावंताच्या जीवनाचे शोकनाट्य वाटते, कोणाला तर मुलांनी असे वागू नये असेसुद्धा वाटते. हे नाटक पाहत असताना प्रेक्षकातील प्रत्येक जण त्या नाटकातील कुठल्या तरी पात्राशी स्वत:ला जोडत असतो. रंगमंचावर हे नाटक सादर होत असताना इतक ते सर्वव्यापी होत जाते. नाटक सुरू असताना नाट्यगृहाचे प्रेक्षक कधी स्तब्ध होतात तर कधी ऊसासे टाकतात तर कधी ओठाशी येणारा हुंदका आवरतात आणि मग डोळे पुसत-पुसत जड अंत:करणाने घरी परततात.
या नाटकाचा मोह मग चित्रपट सृष्टीला न पडेल तर नवल. या नाटकावर सिनेमा पण येऊन गेला रंगभूमी व चित्रपट गाजवणाºया ज्येष्ठ कलावंतांनी त्यात कामे केलीत. सिनेमा छान होता. तो आपापल्या कुवतीनुसार व वकुबानुसार चालला. पण शेवटी तो सिनेमा होता. खºया सुुगंधी फुलांचा गुच्छ कुठे आणि चित्रातली फुलं कुठे ! सिनेमा पाहताना त्या मूळ नाटकातीच आठवण होत होती हे त्या नाटकाची खºया अर्थाने ताकद होय. हे नाटक विलीयम शेक्सपिअयरच्या किंग लियर या इंग्रजी नाटकाचा तो मराठी आविष्कार आहे. शेक्सपिअरची बरीच नाटके मराठी रंगभूमीवर रूपांतरित, भाषांतरीत, अनुवादीत इ. अशा अनेक प्रकारांनी आलीत. मराठीतच नाही तर जगभरातल्या भाषांमध्ये शेक्सपिअर पोहोचला, पण किंग लिअरला जे काही मराठीपण लाभले ते अद्वितीय असे होते.
या नाटकाने केवळ लोकप्रियता नाही मिळवली तर जनसामानाच्या मनात स्थान मिळवले. या नाटकातील प्रत्येक वाक्य, स्वतगं, प्रसंग हे मनाच्या कप्प्यात कोरून ठेवलेली आहेत. जसं आपल्या घरच्या कपाटात ठेवलेली कस्तुरी कपाट उघडल्याबरोबर आपल्या सुगंधाची जशी तरल जाणीव करून देते तसे हे नाटक जेव्हा-जेव्हा स्मृतीच्या पटलावर येते तेव्हा असाच मनमोहक आनंद देऊन जाते आणि आता तर हे नाटक पुन्हा तशाच सुगंधाची उधळण करायला रंगमंचावर अविष्कृत होत आहे. चला.. आपण जरूर पाहू या !
-डॉ.हेमंत कुलकर्णी, जळगाव