पुन्हा दोन गटात उफाळला वाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2019 11:46 AM2019-02-25T11:46:08+5:302019-02-25T11:46:27+5:30
जळगावच्या तांबापुरा भागातील घटना:अकरा जणांना अटक
जळगाव : गेल्या काही दिवसापासून खदखदत असलेला दोन गटातील वाद रविवारी दुपारी तांबापुरात उफाळून आला. दोन्ही गटाचे लोक एकमेकावर चालून गेले. यावेळी दगडफेकीचीही घटना घडली. परस्परविरोधी तक्रारीवरुन दोन्ही गटाच्या १८ जणांविरुध्द दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अकरा जणांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, तांबापुरा व मेहरुण या दोन्ही भागात तणावपूर्ण शांतता आहे.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, अनिता फकिरा घुगे (रा.महादेव मंदिराजवळ, तांबापुरा) यांच्या फिर्यादीनुसार महादेव मंदिर परिसरात तांबापुरात दोन गटात वाद झाला होता. तेव्हा पोलीस व काही प्रमुख लोकांनी मध्यस्थी केल्याने वाद मिटविला होता. रविवारी दुपारी चार वाजता बिजासन घुगे याने आपण बाहेरगावी असताना आधीच्या भांडणात माझे नाव का घेतले असे शकीला कैय्युम खाटीक व सायराबी मोहम्मद रफिक यांना विचारायला गेला असता त्याचा राग येवून या दोघांसह रफिक साहेबबागवान, सुलतान कलीम शेख, शलील शेख, जावेद उर्फ तेड्या, कमा निसार शेख व परवीनबी शहाजद शेख यांच्यासह इतर पाच ते सहा जणांनी अश्लिल शिवीगाळ करुन मारहाण केली. यावेळी शनी महादेव सोनवणे, रवींद्र गणपत घुगे, दीपक मनोहर चाटे, संगीता रवींद्र बाविस्कर यांनी भांडण सोडविले, असे फिर्यादीत म्हटले आहे. या सर्वांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.
तर शकीला कय्युम खाटीक(रा.महादेव मंदिराजवळ, तांबापुरा) यांनीही दुसऱ्या गटाविरुध्द तक्रार दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरुन दहा जणांविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.
या गटाने मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्यावरुन बिजासन उर्फ बबलु फकिरा घुगे, दीपक मनोहर चाटे, दीपक राजाराम माळी, आकाश रवी चांभार, सनी महादेव सोनवणे, सचिन विक्रम वंजारी, राकेश (पुर्ण नाव नाही), रवींद्र उर्फ शेपट्या गणपत घुगे, अनिता फकिरा घुगे व संगीता रवींद्र बाविस्कर यांच्यासह इतर पाच ते सहा जणांविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.
दरम्यान, पोलिसांना चकवा देऊन फरार झालेला जावेद उर्फ तेड्या सय्यद जब्बार याला सहायक फौजदार अतुल वंजारी, रतिलाल पवार यांनी रात्री १० वाजता अटक केली. या घटनेच्या पार्श्वभूमीवर निरीक्षक रणजीत शिरसाठ यांनी तांबापुरात रात्रीचा बंदोबस्त वाढविला आहे.
अकरा जणांना अटक
गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी दोन्ही गटाच्या अकरा जणांना अटक केली. त्यातील तीन जण अल्पवयीन आहेत. अटक केलेल्यांमध्ये शकीला कैय्युम खाटीक, सायराबी मोहम्मद रफिक व खलील शेख तर दुसºया गटाच्या बिजासन उर्फ बबलु फकिरा घुगे, दीपक मनोहर चाटे, रवींद्र गणपत घुगे, अनिता फकिरा घुगे व संगीता रवींद्र बाविस्कर यांचा समावेश आहे.
पोलीस ठाण्यात शेकडोचा जमाव
या वादानंतर पोलिसांनी तांबापुरात धाव घेऊन काही जणांना ताब्यात घेतले असता दोन्ही गटाचे शंभराच्यावर जमाव पोलीस ठाण्यात जमला होता. या जमावाला पांगविताना पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. दरम्यान, पोलीस ठाण्यात गर्दी झाली त्याचवेळी पुन्हा तांबापुरात दगडफेकीची अफवा पसरली होती.