डीबीटी योजनेच्या विरोधात यावल येथे आदिवासी विद्यार्थ्यांचा ठिय्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2018 05:02 PM2018-08-06T17:02:23+5:302018-08-06T17:05:26+5:30
डीबीटी योजनेच्या विरोधात जिल्ह्यातील आदिवासी वसतीगृहातील विद्यार्थी आणि विद्यार्थीनींनी यावल येथील आदिवासी प्रकल्प कार्यालयावर सोमवारी धडक मारत भरपावसात ठिय्या आंदोलन मांडले असून घोषणांनी परिसर दणाणून सोडला आहे.
आॅनलाईन लोकमत
यावल, दि.६ : आदिवासी वसतीगृहातील विद्यार्थ्यांना वसतीगृहाच्या खानावळीतूनच आहार देण्याऐवजी विद्यार्थ्याच्या खात्यावर थेट आहाराचे अनुदान (डीबीटी योजना) देण्याबाबात शासनाने घेतलेल्या निर्णयाच्या विरोधात (राज्यव्यापी आंदोलनाअंतर्गत ) तसेच अन्य १५ शैक्षणिक मागण्यासाठी येथील आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या अंतर्गत असलेल्या जिल्हयातील आदिवासी विद्यार्थी वसतीगृहातील विद्यार्थ्यांनी येथील आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयावर सोमवारी धडक देत सकाळी अकरा वाजेपासून ठिय्या आंदोलन सुरू करीत शासनाच्या या योजनेला जोरदार विरोध केला आहे. भरपावसात ठिय्या आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी यावेळी शासन विरोधी घोषणा देत परिसर दणाणून सोडला होता. जिल्हाभरातून सुमारे ५०० विद्यार्थी येथे धडकले असून सायंकाळपर्यंत विद्यार्थी येणे सुरूच होते. विशेष म्हणजे आंदोलकांमध्ये विद्यार्थींनींचा मोठया प्रमाणात समावेश होता.
राज्यातील आदिवासी विद्यार्थी वसतीगृहात गेल्या अनेक वर्षापासून कंत्राटदारामार्फत विद्यार्थ्यांना भोजन दिले जाते. त्या एैवजी आता भोजन अनुदान विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर जमा करून त्यांनी स्वत: परस्पर जेवणाची व्यवस्था करावी अशी ही शासनाची डीबीटी योजना आहे. शासनाने ही योजना राबविण्याचा नुकताच निर्णय घेतला आहे. या योजनेस जिल्हयातील आदिवासी विद्यार्थी वसतीगृहातील विद्यार्थ्यांचा मोठा विरोध आहे. त्यासाठी जिल्हयातील जळगाव, अमळनेर, चोपडा येथील विद्यार्थी-विद्यार्थीनी यांनी यावल येथे सोमवारी येवून आदिवासी प्रकल्प कार्यालयावर धडक दिली. चार तासांपासून विद्यार्थ्यांनी शासन विरोधी व प्रकल्प कार्यालयाविरोधी घोषणा देत परिसर दणाणून टाकला होता. नंतर आपल्या मागण्यांचे निवेदन प्रकल्प अधिकारी आर. बी. हिवाळे यांना देण्यात आले. निवेदनामध्ये चोपडा वसतीगृहाचा वाढीव कोटा मंजूर करावा, डी. बी. टी. योजना तात्काळ रद्द करावी, यासह अन्य मागण्यांचा समावेश आहे. यावेळी आंदोलन समितीचे जिल्हा प्रमुख होमा वसावे, तुषार पवार, अॅड़ जुम्मासिंग बारेला, भारती पराडके या विद्यार्थ्यांनी मार्गदर्शन केले. फौजदार सुनिता कोळपकर व सहका-यांनी बंदोबसत ठेवला.
दरम्यान, दुपारी साडे चार वाजेपर्यंत या आंदोलनासंदर्भात कोणताही तोडगा न निघाल्याने आंदोलन सुरूच होते. आदिवासी प्रकल्प कार्यालयाचे प्रवेशद्वार बंद करून अधिकारी कार्यालयात होते तर बाहेर विद्यार्थ्यांचा ठिय्या सुरू होता.