जामठी ग्राम पंचायतीवर महिलांचा पाण्यासाठी पुन्हा मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2018 03:31 PM2018-09-14T15:31:26+5:302018-09-14T15:32:11+5:30
पदाधिकारी दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप
जामठी, ता.बोदवड, जि.जळगाव : जामठी येथे पाण्यासाठी व गटारींच्या स्वच्छतेसह इतर सुविधांसाठी येथील प्रभाग क्रमांक तीनमधील संतप्त महिलांनी शुक्रवारी सकाळी थेट ग्राम पंचायत कार्यालयावर मोर्चा काढला.
आमच्या प्रभागाला कुठल्याही सुविधा मिळत नाही आणि प्रभागातील पदाधिकारी या प्रभागाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप संतप्त महिलांनी केला आहे. पदाधिकारी ग्रामसभेला उपस्थित राहत नाही. त्यामुळे समस्या सुटत नाही. यासाठी प्रभाग क्रमांक तीनला ओडिए योजनेव्यतिरिक्त या प्रभागास कूपनलिकेद्वारे पाणीपुरवठा करण्यात येतो.
कूपनलिकेचा वीजपुरवठा हा सुरू होऊनही व ३० ते ३५ दिवस उलटूनही या प्रभागात कुठलाही पाणीपुरवठा करण्यात आलेला नाही. येथील स्मशानभूमीत नवीन कूपनलिकेच्या दुरुस्तीअभावी ती बंद आहे. त्यामुळे या प्रभागातील नागरिकांवर तीव्र पाणीटंचाईचे संकट कोसळले आहे. याकडे व ग्राम पंचायत प्र्रशासन साफ दुर्लक्ष करीत आहे, असा आरोप महिलांनी केला.
ग्रामपंचायतीने दोन ठिकाणी खोदलेल्या विहिरींचा उपयोग हा दुसरेच व्यक्ती स्वत:च्जा शेतीकरिता करतात. असे असूनदेखील ग्रामपंचायत प्रशासन या दोन्ही विहिरी ताब्यात घेत नाही. तरी या दोन्ही विहिरी ग्राम पंचायतीने घेऊन तेथून गावातील टाक्यांपर्यंत पाईप लाईन करावी व विहिरीतून मिळणारा जलसाठा प्रभागातील नागरिकांना द्यावा तथा प्रभागातील गटारी या तुडूंब भरलेल्या असल्याने येथील लहान मुले व काही नागरिक हे आजारी पडत आहे. या सर्व समस्यांवर चर्चा करण्याकरिता आजच्या आज ग्रामपंचायत प्रशासनाच्यावतीने विशेष ग्रामसभा बोलवावी व त्यात मांडलेल्या प्रभागातील सर्व समस्या त्वरित सोडविण्यात याव्यात अन्यथा हे आंदोलन बोदवड पंचायत समितीसमोर करण्यात येईल, असा इशारा महिलांकडून देण्यात आला आहे.