राज्यात विरोधात, जिल्ह्यात हम साथ साथ!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2021 04:19 AM2021-08-23T04:19:10+5:302021-08-23T04:19:10+5:30
भडगाव : राजकारणात कोणीही कुणाचा शत्रू नसतो. कधी मित्रही नसतो. परंतु राज्यात भाजपा व शिवसेनेची युती ...
भडगाव : राजकारणात कोणीही कुणाचा शत्रू नसतो. कधी मित्रही नसतो. परंतु राज्यात भाजपा व शिवसेनेची युती तुटूनही सावदे येथील श्री हनुमान मंदिर बांधकामाच्या भूमिपूजनप्रसंगी धार्मिक कार्यक्रमात चाळीसगावचे भाजपाचे आमदार मंगेश चव्हाण व पाचोरा भडगावचे शिवसेना आमदार किशोर पाटील एकाच व्यासपीठावर हजर होते. जातानाही एकाच गाडीवरील सीटवर बसून गेले.
राज्यात भाजपा शिवसेनेची युती तुटली तरी आजही आमची मैत्री कायम आहे. राज्यात विरोधात, जिल्ह्यात हम साथ साथ, असे चित्र दिसून आले. दोघा आमदारांनी मित्ररूपाने टोल्यांचे चौकार मारून क्रिक्रेटप्रमाणे विनोदाने बॅटिंग केली.
हा कार्यक्रम सावदे, ता. भडगाव येथे दि. २१ रोजी गावकऱ्यांकडून आयोजित करण्यात आला होता. भाजप शिवसेना युती तुटली; पण आमची मैत्री कायम आहे, असे उद्गार काढले भाजपाचे आमदार मंगेश चव्हाण यांनी. ते पुढे म्हणाले, आपला चाळीसगाव- पाचोरा विधानसभा मतदारसंघ असताना व भाजप शिवसेना युती असताना, २८ गावे चाळीसगावचे पाचोरा मतदारसंघात असल्याने आम्ही आर. ओ. पाटील यांच्या विधानसभा निवडणुकीत प्रचाराला फिरायचो. आम्ही तुमचे जुने कार्यकर्तेच आहोत. राजकारणात कोणी कुणाचा शत्रू नसतो. कधी मित्रही नसतो. राजकारण ट्वेंटी ट्वेंटीच्या मॅचेस असतात. कोण कुठे बॅटिंग करेल, सांगता येत नाही, असे ते म्हणाले.
मी आता माझा चाळीसगावचा मतदारसंघ सोडून जात नाही. कारण सध्या नको त्या चर्चा होतात. परंतु अशा धार्मिक कार्यक्रमांना गावकऱ्यांनी बोलाविल्यावर जावे लागते. सावदेसह काही संबंधांचे गावेही माझी आहेत, असा चौका आमदार मंगेश चव्हाण यांनी लगावला.
शिवसेनेचे आमदार किशोर पाटील यांनीही कार्यक्रमात या हनुमानाच्या मंदिरात सभागृहाच्या बांधकामासाठी १० लाखांचा निधी जाहीर करताच टाळ्यांचा कडकडाट सुरू झाला. यानंतर मात्र आमदार किशोर पाटील हे भाजपाचे आमदार मंगेश चव्हाण यांच्याकडे हातवारे करीत म्हणाले, आमदार मंगेश पाटील हे माझे जुने मित्र आहेत. सावदेसह ४ गावेही माझी आहेत, असे आमदार मंगेश पाटील यांनी आता सांगितले. तेच म्हणतो की, या गावांमध्ये या विधानसभा निवडणुकीत काही मतांनी मी मायनस झालो. मागील काळात आपल्या चाळीसगाव पाचोरा विधानसभा मतदारसंघात निवडणुकीत आर. ओ. पाटील यांच्या प्रचाराला आम्ही यायचो, तेव्हा मी पोलीस म्हणून नोकरीला होतो. आज या जुन्या आठवणींना उजाळा मिळत असून आम्ही दोघे मित्र आज या धार्मिक कार्यक्रमाला एकाच व्यासपीठावर आलो. आज या व्यासपीठावर सर्वपक्षीय, सर्व विचारांच्या लोकांना गावकऱ्यांनी, मारुतीरायाने एकत्र आणले. याचा आनंद आहे. असेही आमदार किशोर पाटील यांनी सांगितले.
वीज वितरण कंपनी अधिकाऱ्यांच्या विरोधात भाजपचे आमदार मंगेश चव्हाण व शिवसेनेचे सत्ताधारी आमदार किशोर पाटील या दोघांनी वेगवेगळे स्टाइलने आंदोलन केले होते. मात्र शेतकऱ्यांची बाजू घेत वीज वितरणच्या अधिकाऱ्यांना वीज समस्येबाबत चांगलाच जाब विचारला होता. दोघा आमदारांचे विषय त्यावेळी खूपच चर्चेचे अन् आरोप-प्रत्यारोप करणारे ठरले होते. मात्र त्यावेळी भाजपचे आमदार मंगेश चव्हाण व शिवसेनेचे आमदार किशोर पाटील या दोघांनीही एकमेकांचे या आंदोलन भूमिकेबाबत कौतुक करीत अभिनंदनही केले होते.
220821\22jal_9_22082021_12.jpg
सावदे येथे कार्यक्रमात एकमेकाशी गुप्तगू करताना भाजपाचे आमदार मंगेश चव्हाण व शिवसेनेचे आमदार किशोर पाटील, सोबत मान्यवर.