आगळ््या-वेगळ््या वृषभाचे आकर्षण : ह्यगज्याह्णचे वय अवघे ९ वर्षे, वजन तब्बल १ टन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2019 12:41 PM2019-11-17T12:41:17+5:302019-11-17T12:41:33+5:30
पाहण्यासाठी कृषी प्रदर्शनात गर्दी
जळगाव : बळीराजाचा सवंगडी वृषभ राजा हा त्याच्या धष्टपुष्ट शरीर व कष्टाच्या कामामुळे ओळखला जातो. मात्र सांगली जिल्ह्यातील कसबे डिग्रज (ता. मिरज) येथील शेतकरी कृष्णा यशवंत सायमोते हे छंद म्हणून संभाळ करीत असलेल्या ह्यगज्याह्ण नावाच्या वृषभ राजाचे वय आहे केवळ ९ वर्षे, मात्र त्याचे वजन आहे तब्बल १ टन. त्यामुळे हा आगळावेगळा प्रकारचा वृषभ राजा अख्ख्या महाराष्ट्राचे आकर्षण ठरला असून तो सध्या जळगाव येथे आयोजित कृषी प्रदर्शनात आला असून त्याला पाहण्यासाठी गर्दी होत आहे. देशातील सर्वाच मोठा बैल असल्याचा दावा सायमोते यांनी केला आहे. या वृषभाचा शेतीकामासाठी नाही की कोणत्याही कामासाठी उपयोग केला जात नाही. केवळ प्रदर्शन, महोत्सवात त्याचा सहभाग असतो.
अवघ्या ९ वर्षात सहा फूट उंची
गज्याचा जन्म आॅक्टोबर २०११मध्ये झाला. देशी व जर्सी हायब्रीड जातीच्या या गज्याला सुरुवातीपासूनच सायमोते यांनी पोषक खाद्य देण्यास सुरुवात केली. त्यामुळे त्याची वाढ चांगली होऊ लागली. हळूहळू गज्याचे शरीर धष्टपुष्ट झाले. त्यानंतर आता तर अवघ्या नऊ वर्षाचा असताना गज्याची उंची सहा फूट, लांबी १० फूट होऊन त्याचे वजन १ टनाच्यावर पोहचले. दररोज गज्याचा खाद्याचा खर्च ५०० रुपये असल्याचे सांगण्यात आले.
वातानुकुलीत गोठा
गज्याच्या खाद्याची काळजी घेण्यासह त्यासाठी मालकांनी खास रहिवास ठेवला आहे. यासाठी खास वातानुकूलित गोठा तयार करण्यात आला आहे. त्या ठिकाणी त्याला बांधण्यात येते.
नित्यनियमाने व्यायाम
गज्याचा दिनक्रम सुरू होतो व्यायामाने. झोप झाल्यानंतर पहाटे पाच वाजता गज्याला फिरस्तीला नेले जाते. जवळपास सकाळी साडेसहा वाजपर्यंत त्याला बाहेर फिरवून आणले जाते व त्याचा व्यायामही या वेळेत करून घेतला जातो.
प्रवासात थांबा आवश्यक
गज्याला कोठे न्यायचे झाल्यास त्यासाठी खास वाहनाची व्यवस्था करण्यात आली आहे. दर ६० कि.मी. अंतरावर थांबा घ्यावा लागतो. विशेष म्हणजे प्रवासादरम्यान गज्याची मजीर्ही संभाळावी लागते. त्याचा ह्यमूडह्ण पाहून अनेक ठिकाणी वाहन थांबवावे लागते. त्यामुळे जळगावात येतानाही थांबे घ्यावे लागल्याने शुक्रवारी सकाळपासून प्रतीक्षा असलेला गज्या शुक्रवारी रात्री सव्वा अकरा वाजता जळगावात पोहचला.
शेतीकाम नव्हे, केवळ प्रदर्शनात सहभाग
गज्याकडून कोणतेही शेतीकाम करून घेतले जात नाही. त्याचा ेकेवळ विविध महोत्सव, कृषी प्रदर्शनामध्ये सहभाग असतो. आतापर्यंत महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा या तीन राज्यांतून गज्याचा प्रवास झाला असून त्याला व विविध पुरस्कारदेखील मिळाले आहे.