ज्येष्ठांची वयोमर्यादा 65 ऐवजी 60 करणार
By admin | Published: April 29, 2017 06:33 PM2017-04-29T18:33:04+5:302017-04-29T18:33:04+5:30
ज्येष्ठांना पर्यटनासाठी विशेष सवलत देण्यासाठी प्रयत्न राहिल
ऑनलाइन लोकमत
धुळे, दि. 29 - ज्येष्ठ नागरिक म्हणजे समाजासाठी अमूल्य ठेवा आहे. त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी शासनाकडून प्राधान्य दिले जाईल. तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी 65 ऐवजी 60 वर्ष वयोमर्यादा करण्यासाठी प्रयत्न केले जातील. तसेच ज्येष्ठांना पर्यटनासाठी विशेष सवलत देण्यासाठी प्रयत्न राहिल, असे प्रतिपादन रोजगार हमी योजना व पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी केले.
महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघाच्या (फेस्कॉम) 32 व्या वार्षिक अधिवेशनाचे उद्घाटन शनिवारी सकाळी शहरातील शाहू नाटय़गृह झाले. यावेळी ते बोलत होते. रविवारी या अधिवेशनाचा समारोप होणार आहे. यावेळी फेस्कॉम सुकाणू समितीचे अध्यक्ष प्राचार्य व्ही.के.भदाणे, अध्यक्ष डी.टी.चौधरी, उपाध्यक्ष जी.एल.पाटील, नाना इंगळे, सोमनाथ बागड, अण्णा टेकाळे, प्राचार्य बी.एन.पाटील, अरुण रोडे आदी उपस्थित होते. सकाळी माजी आमदार व अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष राजवर्धन कदमबांडे यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण व शपथविधी कार्यक्रम संपन्न झाला. तसेच दिवसभर ज्येष्ठांसाठी विविध चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले होते.
प्रेरणादायी कहान्या प्रसिद्ध करणार
जयकुमार रावल म्हणाले की, ज्येष्ठ नागरिकांचा विविध क्षेत्रातील अनुभवाचा फायदा शासनाला व्हावा म्हणून त्यांची समिती स्थापन करण्याच्या दृष्टीनेही विचार करण्यात येईल. या समितीचा सल्ला शासन घेईल. वयस्कर नागरिकांचे प्रेरणादायी कहान्या लोकराज्य मासिकातून प्रसिद्ध करण्यासाठीही प्रयत्न केले जातील. लोकराज्यमधील प्रत्येक अंकातील काही पाने किंवा वर्षातून एखादा अंक ज्येष्ठांवर आधारित काढण्यासाठी प्रयत्न राहतील. असेही त्यावेळी ते म्हणाले. शासन ज्येष्ठांच्या बाबतीत संवेदनशील आहे.
विविध कार्यक्रम
अधिवेशनानिमित्त सकाळी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मान्यवरांच्या उपस्थितीत ईशस्तवन, शंकर व गणेश वंदना, जिजाऊ वंदना कार्यक्रम झाला. त्यानंतर सानेगुरुजी यांची ‘खरा तो एकची धर्म’ प्रार्थना सादर करण्यात आली. तसेच यावेळी ‘ज्येष्ठराज’ स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. त्यानंतर प्रातिनिधिक स्वरूपात ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला.
ज्येष्ठांची दशा व दिशा या विषयावर अरुण रोडे यांनी मार्गदर्शन केले. अध्यक्षस्थानी र.ग.चौधरी होते. यानंतर ‘निरोगी जीवन’ याविषयावर माया डॉ.माया कुलकर्णी, डॉ.गायत्री भतवाल, डॉ.माधुरी बाफना यांनी मार्गदर्शन केले.
शासकीय योजना व अंमलबजावणी या विषयावर तहसीलदार ज्योती देवरे, मानसिंग जगताप, रंगराव पाटील यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अण्णासाहेब टेकाळे होते. या कार्यक्रमासाठी खान्देशातून सुमारे 1500 ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.