वृद्ध आणि महिलांना कायद्याचे कवच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2019 03:38 PM2019-03-12T15:38:50+5:302019-03-12T15:41:48+5:30
पाटणा येथे 'महिला कायदा व सुरक्षा' या विषयावर आधार कायदेविषयक केद्राच्या अध्यक्षा व संभाजी सेना विधी सल्लागार अॅड.आशा शिरसाट यांनी मार्गदर्शन केले. वृद्ध आणि महिलांना कायद्याचे सुरक्षा कवच असून त्यांनी ते माहीत करुन घ्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.
चाळीसगाव, जि.जळगाव : पाटणा येथे 'महिला कायदा व सुरक्षा' या विषयावर आधार कायदेविषयक केद्राच्या अध्यक्षा व संभाजी सेना विधी सल्लागार अॅड.आशा शिरसाट यांनी मार्गदर्शन केले. वृद्ध आणि महिलांना कायद्याचे सुरक्षा कवच असून त्यांनी ते माहीत करुन घ्यावे, असे आवाहनही त्यांनी केले. नुकतेच येथे मार्गदर्शन शिबिर पार पडले.
पुढे बोलताना त्या म्हणाल्या, सुरक्षित वातावरण उपलब्ध करुन देणे हे समाजातील जबाबदार घटकांचे कर्तव्य असून सर्वांनी प्रयत्नशील रहायला हवे. समाजात महिलांना सन्मानाने जगता यावे व त्यांना सुरक्षित वातावरण उपलब्ध करुन देण्यासाठी कायदयांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात आली आहे. अन्यायाविरुद्ध आवाज उठवायला महिलांनी पुढे यायला हवे. प्रत्येक पोलीस स्टेशनला हुंडा प्रतिबंधक अधिकाऱ्याची नियुक्ती, जिल्हा तसेच तालुकास्तरीय समित्यांची स्थापना या कायद्यांतर्गत करण्यात आलेली असते हे कायदे महिलांना माहित असायला हवेत. कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायदा असो वा इतर फौजदारी कायदे असो राज्य महिला आयोगामार्फतही महिलांच्या या हक्क व अधिकारांची जपणूक केली जाते. यासोबतच कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ होऊ नये म्हणून विशाखा गाईड लाईन्सची अंमलबजावणी राज्यात सुरू असून राज्यभर तक्रार निवारण समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. वयोवृद्ध व्यक्तींसाठी स्वतंत्र अशा पालनपोषण कायद्याची तरतूद केलेली असून वृद्धांनाही निराश्रीत न रहाता सन्मानाने जगता यावे यासाठी या कायद्याची तरतूद केलेली आहे. महिला,मुली आणि बालकांसाठी कायद्याची अंमलबजावणी प्रभावीपणे सुरू असल्याचेही त्यांनी नमूद केले.
यावेळी युगंधरा फाउंडेशनच्या संस्थापिका स्मिता बच्छाव, देवरे फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ.उज्ज्वला देवरे, रोटरी क्लबचे अध्यक्ष प्रदीप भांडारकर, हिरकणी महिला मंडळाच्या संस्थापिका सुचित्रा पाटील, रांगोळी कलाकार कावेरी पाटील, माजी सरपंच अभिजीत शितोळे, योगिता राजपूत, अनिता शर्मा, विद्या कोतकर, स्वप्नील कोतकर, ब्रिजेश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
सूत्रसंचालन मुकुंद शितोळे यांनी, प्रास्ताविक शीतल शितोळे यांनी व आभार मुकुंद शितोळे यांनी मानले. यशस्वीतेसाठी चेतन शितोळे, गणपत चौधरी, नीलेश साळुंखे यांनी परिश्रम घेतले.