शेड नेट घोटाळ्याच्या चौकशीची मागणी, चार शेतकऱ्यांनी स्वत:ला घेतले गाडून
By संजय पाटील | Published: January 26, 2024 01:33 PM2024-01-26T13:33:53+5:302024-01-26T13:34:27+5:30
दोन आठवड्यात गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन मिळाल्याने तीन तासांनी हे आंदोलन मागे घेण्यात आले.
अमळनेर : शेड नेट घोटाळ्याची चौकशी होत नसल्याने, चार जणांनी शुक्रवारी प्रजासत्ताक दिनी सकाळी तहसील कार्यालयाबाहेर स्वतःला गाडून घेत अनोखे आंदोलन केले. दोन आठवड्यात गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन मिळाल्याने तीन तासांनी हे आंदोलन मागे घेण्यात आले.
अमळनेर व पारोळा तालुक्यात अनुदानित शेडनेट तसेच पॉलिहाऊसमध्ये घोटाळा झाला. दलालांनी साहित्य शेतकऱ्यांपर्यंत न पोहचविता परस्पर रक्कम हडप केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सचिन पाटील, शिवसेनेचे अनंत निकम, कैलास पाटील, नारायण पाटील, ईश्वर पाटील या शेतकऱ्यांनी जिल्हाधिकार्यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आला होता. कारवाई न झाल्यास स्वतःला गाडून आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता. त्यानुसार सचिन पाटील, अनंत निकम, कैलास पाटील, ज्ञानेश्वर पाटील यांनी २६ रोजी सकाळी स्वतःला मातीत गाडून घेतले होते.
तहसीलदार व तालुका कृषी अधिकारी यांनी दोन आठवड्यात शेड नेट घोटाळ्याची चौकशी करून गुन्हे दाखल केले जातील, असे आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले.