राष्ट्रीय किसान मोर्चातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:40 AM2021-01-13T04:40:31+5:302021-01-13T04:40:31+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी कायद्याच्या विरोधात दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी कायद्याच्या विरोधात दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राष्ट्रीय किसान मोर्चाच्यावतीने सोमवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरू करण्यात आले आहे. १७ जानेवारीपर्यंत साखळी पद्धतीने हे आंदोलन सुरू राहणार आहे.
केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी कायद्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार असून या विरोधात दिल्ली येथे शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. याला पाठिंबा देण्यासाठी सोमवार, ११ जानेवारीपासून देशभरात धरणे आंदोलन सुरु केले आहे. देशातील ५५० जिल्ह्यांमध्ये हे आंदोलन करण्यात येत असून जळगाव येथेही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रीय किसान मोर्चातर्फे आंदोलन सुरु करण्यात आले. या वेळी आंदोलकांच्यावतीने जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
राष्ट्रीय किसान मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रा.शिवाजीराव पाटील, राज्याध्यक्ष चंद्रकांत जगदाळे, जिल्हाध्यक्ष विश्वासराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली सकाळी ११ ते संध्याकाळी ५ या वेळेत हे आंदोलन करण्यात येऊन नंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
साखळी पद्धतीने आंदोलन
११ जानेवारी रोजी जळगाव व जामनेर तालुक्यातील शेतकऱ्यांनी आंदोलन केले. १२ रोजी बोदवड व मुक्ताईनगर तालुक्यातील, १३ रोजी रावेर व भुसावळ तालुक्यातील, १४ रोजी चोपडा व यावल तालुक्यातील, १५ रोजी अमळनेर, पारोळा, धरणगाव तालुक्यातील, १६ रोजी पाचोरा व भडगाव तालुक्यातील, १७ रोजी एरंडोल व चाळीसगाव तालुक्यातील शेतकरी आंदोलन करणार आहेत.