संतप्त नागरिकांचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या घरासमोर आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2019 12:31 PM2019-10-29T12:31:34+5:302019-10-29T12:32:32+5:30
दिवाळीच्या दिवशीच घरांमध्ये शिरले पाणी
जामनेर, जि. जळगाव : ऐन दिवाळीच्या दिवशी जामनेर शहरात झालेल्या मुसळधार पावसाने शहरातील विविध भागात व रहिवासी वसाहतीतील घरांमध्येय मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने संतप्त नागरीकांनी सोमवारी सकाळी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन केले. नगरपालिकेच्या ढिसाळ कारभाराचे नागरीकांनी वाभाडे काढले.
दरम्यान, पालकमंत्री महाजन यांनी पालिकेचे मुख्याधिकाऱ्यांना तातडीने व्यवस्था करण्याचे आदेश दिले व इंदिरा आवास, दामले प्लॉट भागात सुरक्षा भिंत व पाण्याचा निचरा होण्यासाठी गटार बांधण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलक शांत झाले.
शनिवारी रात्री व रविवारी शहरात झालेल्या मुसळधार पावसाने श्रीराम नगर, शिक्षक कॉलनी, दत्त चैतन्य नगर, वाकी रोड, जळगांव रोड परिसरात व पोलीस ठाणे परिसरात पाणी साचले. पुरा भागातील दामले प्लॉट व इंदिरा आवास नगरमधील काही घरांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने रहिवाशांचे मोठे नुकसान झाले. पाणी घरात शिरल्याने जीवनावश्यक वस्तू वाहुन गेल्या. मोठे नुकसान होऊनदेखील या भागातील नगरसेवकांनी नागरिकांची साधी विचारपूसही न केल्याने नागरिकांच्या संतापात भर पडली. निवडणुकीत मते मागायला येणाऱ्यांनी ऐन दिवाळीच्या सणात ओढवलेल्या संकट समयी पाठ फिरवल्याने संतापाचा उद्रेक झाला.
याच संतापातून सुमारे दोनशे महिला, पुरुषांनी सोमवारी सकाळी महाजन यांचे निवासस्थान गाठले. यावेळी काही नगरसेवक हजर होते. महाजन यांना भेटून कैफीयत मांडण्याचा हट्ट नागरिकांनी धरल्याने महाजन यांनी त्यांची भेट घेऊन समजूत घातली व तातडीने कार्यवाहीचे आश्वासन दिले.
दरम्यान, शहरात होत असलेल्या भुयारी गटारीच्या सदोश कामामुळे काही भागात गटारीचे पाणी रस्त्यावर येत असल्याने घरात घाण पाणी शिरत आहे. पालिकेने याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.