४५ दिवसांत रस्ता सुरू करण्याच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2021 04:13 AM2021-06-20T04:13:44+5:302021-06-20T04:13:44+5:30
अमळनेर : गेल्या दीड वर्षांपासून दगडी दरवाज्याच्या थांबलेल्या कामामुळे बंद असलेला सराफ बाजाराचा रस्ता ४५ दिवसांच्या आत सुरू करून ...
अमळनेर : गेल्या दीड वर्षांपासून दगडी दरवाज्याच्या थांबलेल्या कामामुळे बंद असलेला सराफ बाजाराचा रस्ता ४५ दिवसांच्या आत सुरू करून कामालाही सुरुवात करण्याचे लेखी पत्र पालिकेने दिल्यानंतर दगडी दरवाजा पुनर्निर्माण समितीने आंदोलन मागे घेतले आहे.
दगडी दरवाज्याचे बुरूज पडून बरेच महिने उलटले असून पुनर्निर्माणचे काम बंद आहे. त्यामुळे सराफ बाजारातील रस्ता बंद आहे. पंकज चौधरी तथा पुनर्निर्माण समितीने दररोज विविध प्रकारचे आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. पालिकेच्या मुख्याधिकारी डॉ. विद्या गायकवाड यांनी अमन कन्स्ट्रक्शनला तीन नोटिसा दिल्या होत्या. अखेर नगराध्यक्ष पुष्पलता पाटील यांच्या कार्यालयात माजी आमदार साहेबराव पाटील, उपमुख्याधिकारी संदीप गायकवाड, अभियंता संजय पाटील, समितीचे मुकुंद विसपुते, विरोधी पक्ष गटनेता प्रवीण पाठक, माजी उपनगराध्यक्ष गोपी कासार, पंकज चौधरी, बाळासाहेब संदानशिव, कमल कोचर, हर्षल विसपुते, अक्षय अग्रवाल, राजेंद्र पोतदार, वास्तू विशारद चेतन सोनार, अमन शहा यांची बैठक घेऊन चर्चा केली. यात तातडीने काम सुरू करून दरवाज्याच्या दगडी साच्याला पक्का आधार देवून, ४५ दिवसांत रस्ता सुरू करून द्यावा. तसेच बुरुजाच्या बाजूनेदेखील सुविधा करून द्यावी आणि दरवाज्याचे काम सुरू ठेवावे, असा निर्णय घेण्यात आला.
ठेकेदारकडून लेखी घेऊन पालिकेने समितीला लेखी आश्वासन दिले. त्यांनतर आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला.