तपोवनात अग्निहोत्र यज्ञाचे आकर्षण कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2017 05:13 PM2017-03-24T17:13:23+5:302017-03-24T17:13:23+5:30
पारोळा -अमळनेर रस्त्यावरील तपोवन येथे अखंडपणे सुरू असलेल्या महामृत्युंजय यज्ञास 25 मार्च 17 रोजी रोजी 17 वर्षे पूर्ण होत आहेत.
रत्नापिंप्री : पारोळा -अमळनेर रस्त्यावरील तपोवन येथे अखंडपणे सुरू असलेल्या महामृत्युंजय यज्ञास 25 मार्च 17 रोजी रोजी 17 वर्षे पूर्ण होत आहेत. वातावरण शुद्धीसाठी या महामंत्राचा उपयोग होत आहे. याच बरोबर येथे होमिओथेरपी पध्दतीने नर्सरी विकसित करण्यात आली आहे.
25 मार्च 2001 पासून ॐ (ओम) त्र्यंबकम् या महामृत्युंजय यज्ञाचा प्रारंभ झाला.या अग्निहोत्र यंत्राबद्दल परिसरात आकर्षण असून, भाविकांची गर्दी असते.
भारतीय संस्कृतीत अग्निला महत्व आहे. 2004च्या मार्च महिन्यात योगदान वेद विज्ञान आश्रमशाळेतर्फे पर्जन्य यज्ञाचा कार्यक्रम झाला. याचा फायदा पर्जन्यासाठी झाल्याचा दावा करण्यात येतो. रोज सुर्योदय व सुर्यास्ताच्यावेळी अग्निहोत्र नियमित केले जाते.
अग्निहोत्राचे परिणाम
यज्ञ तत्वातील ‘अग्निहोत्र’ नामक यज्ञ आज प्रत्येक घरात होणे आवश्यक आहे. अग्निहोत्र अग्निच्या माध्यमाने वायुमंडळाची शुद्धी करण्याची वैज्ञानिक प्रक्रिया आहे. एका विशिष्ट पद्धतीने प्रत्येकाने आपापल्या घरात ते नित्य करायला हवे. सूर्याेदय आणि सूर्यास्तावेळी होम करावा. अग्निहोत्राचा जगभर प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठी पू.वसंतराव परांजपे हे प्रचाराकरीता देशविदेशात फिरले आणि यज्ञाचे महत्व पटवून दिले. त्यातच त्यांनी देशविदेशातील बहुसंख्य उपासक तयार केले. रत्नापिंप्री येथे श्रीक्षेत्र शिवधाम व तपोवन फायुफोल्डपाथ मिशनची स्थापना करण्यात आली.
तपोवनात याज्ञिक पद्धतीनेच शेती केली जाते. तसेच याच पद्धतीने नर्सरीही तयार करण्यात आलेली आहे. नर्सरीत अनेक प्रकारची आयुर्वेदीक झाडे, फळझाडे, फुलझाडी,तयार करण्यात आली आहेत. अक्कलकोट येथील सद्गुरू गजानन महाराज यांचे 1985 मध्ये आगमन झाले. यापासून अग्निहोत्र प्रचारासाठी विशेष महत्व देऊन, तपोवन व फाव्ह्यू फोल्ड पाथ मिशनची निर्मिती झाली. यापासून अग्निहोत्राचा प्रचार आणि प्रसाराला सुरवात झाली असल्याची माहिती तपोवनचे प्रमुख अभय परांजपे (धुळे) यांनी दिली. ब्रुस जॉन्सन (ऑस्ट्रेलिया) यांच्यासह व्यवस्थापक म्हणून संजय पाटील हे काम पाहत आहेत. (वार्ताहर)