तणावमुक्त जीवन जगण्यासाठी ‘अग्निहोत्र’ - डॉ. पुरुषोत्तम राजीमवाले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2020 10:37 PM2020-03-25T22:37:40+5:302020-03-25T22:37:54+5:30
जीवनाच्या प्रत्येक क्षणाचा सदुपयोग करा, मन समृध्द करणारा हा तर महामार्ग
जळगाव : अग्निहोत्र हा मन समृद्ध करण्याचा महामार्ग आहे. तणावमुक्त व आरोग्य संपन्न समाज यातून घडत आहे, असे मत अक्कलकोट येथील विश्व फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. पुरुषोत्तम राजीमवले यांनी व्यक्त केले.
नुकत्याच आयोजित केलेल्या सामूहिक अग्निहोत्र कार्यक्रमात त्यांनी उपस्थिती दिली. त्यावेळी त्यांनी ‘लोकमत’ शी संवाद साधला. ‘अग्निहोत्र’चे फायदे, तसेच प्रदूषण रोखण्यासाठी ‘अग्निहोत्र’चा कसा फायदा होतो, याबाबत त्यांनी मनमोकळ्या गप्पा मारल्या. त्यांच्याशी झालेला हा संवाद.
प्रश्न : अग्निहोत्र म्हणजे काय? ते केव्हा करावे?
उत्तर : सूर्र्यचक्रानुसार पृथ्वीचे परिचालन होते. सूर्य हा सृष्टीचा महत्वाचा घालक आहे. सूर्याच्या अस्तित्वाशिवाय सृष्टीची कल्पनादेखील आपण करू शकत नाही. म्हणून सूर्याच्या तालचक्रावर मन:शांतीसाठी सूर्योदय व सुर्यास्तावेळी कृतज्ञतापूर्वक आहुती देणे म्हणजे अग्निहोत्र होय. अग्निहोत्र हा दैनंदिन केला जाणारा एक यज्ञ आहे. सूर्योदय व सूर्यास्तावेळी घरामधील वातावरण पवित्र करण्यासाठी अग्निहोत्र यज्ञ केला जातो. आयुर्वेदानुसार अग्निहोत्रामुळे अनेक व्याधींवर मात करता येते आणि जीवन आरोग्यसंपन्न होते.
प्रश्न : अग्निहोत्र संकल्पना जगासमोर मांडण्याची सुरुवात आपण कशी केली?
उत्तर : आज प्रत्येक मानव कोणत्या ना कोणत्या तणावाखाली जगत आहे. केवळ ताणतणाव वाहून नेण्यासाठीच आपले जीवन नाही तर मन व बुद्धी तणावरहित करून जीवनातील संकटांना मुक्तपणे सामोरे जाण्याचे सामर्थ्य निर्माण होणे आवश्यक आहे. त्यासाठी दत्त परंपरेने आम्हाला अग्निहोत्र दिले. याद्वारे मानव मानसिकदृष्ट्या समृद्ध व्हावा, यातून या कायार्ची सुरुवात केली.
प्रश्न : धावपळीच्या जीवनात तरुणांनी आपली कर्तव्ये व अध्यात्म यांची सांगड कशी घालावी?
उत्तर : तारुण्यावस्था हा आयुष्याला कलाटणी देणारा काळ असतो. या अवस्थेत मन पुष्ट केल्यास उदंड सामर्थ्य मिळते. उज्वल भवितव्य घडविण्यासाठी तसेच जीवनात येणाऱ्या समस्यांचा लढा देण्यासाठी दररोज थोडा वेळ देऊन अग्निहोत्र करावे. यातून कौटुंबिक वातावरण पवित्र होते. तरुणांनी व्यसनांपासून दूर रहावे. आज कित्येक तरुण नैराश्यातून आत्महत्या करतात. ही बाब अत्यंत खेदजनक असून मिळालेल्या सुंदर जीवनातील प्रत्येक क्षणाचा सदुपयोग करायला हवा.
प्रश्न : अग्निहोत्रातून पर्यावरण संतुलन कसे राखले जाते?
उत्तर : ज्या ठिकाणी सामूहिक अग्निहोत्र कार्यक्रम होतात तिथे याबाबत संशोधनासाठी उपकरणे मुंबई येथील एका संस्थेने ठेवलेली असतात. यातून पर्यावरण शुद्धी कशी होते हे संशोधनाअंती जाहीर करणार आहे.
अध्यात्म म्हणजे केवळ परंपरांचे अनुकरण नव्हे. प्रत्येक धार्मिक उत्सवातून जीवनात बदल घडावा, हा उद्देश आहे. जीवन हे केवळ कालचक्र नसून ते कर्म आणि परमार्थ यांची सांगड घालून प्रत्येक क्षण सत्कारणी लावण्यासाठी जगायला हवे. जीवनात मन:शांती व समाधान हवे.
-डॉ. पुरुषोत्त राजीमवले