जगवाणी आॅईल मिलमध्ये ‘अग्नितांडव’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2019 01:45 AM2019-10-05T01:45:51+5:302019-10-05T01:46:10+5:30
लाखोंचे नुकसान : पाच अग्निबंबाच्या मदतीने आग आटोक्यात
जळगाव- औद्यागिक वसाहत परिसरातील बी-११ मधील जगवाणी आॅईल मिलला शुक्रवारी रात्री ११ वाजता भीषण आग लागल्याची घटना घडली. आगीने रौद्ररूप धारण केल्यामुळे हाहाकार उडाला होता. अखेर पाच अग्निशमन बंबाच्या मदतीने रात्री सव्वा वाजेच्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले़ मात्र, या आगीत लाखो रूपयांचे खोबरे, तेल, तूप तसेच सरकी ढेप जळून खाक झालेले होते.
आरटीओ कार्यालय परिसरातील रहिवासी हरिष जगवाणी यांच्या मालकीची औद्यागिक वसाहत परिसरातील बी-११ मध्ये जगवाणी आॅईल मिल आहे. याठिकाणी खोबरे तेल, तूपाची निर्मिती केली जाते. शुक्रवारी रात्री साडे नऊ वाजेच्या सुमारास मिलच्या मागील बाजूने धूर निघत होता. हा प्रकार लक्षात येताच सुरक्षारक्षकाने लहान बॉयलर बंद केले. मात्र, रात्री ११ वाजेच्या सुमारास शॉर्टसर्कीटमुळे मिलमध्ये टेवलेल्या खोबरे व सरकी ढेपला आग लागली. धुराचे लोळ उठू लागल्यामुळे परिसरातील नागरिकांना कंपनीत आग लागल्याचे लक्षात आले. त्यांनी त्वरित हा प्रकार सुरक्षारक्षकास सांगितला़ व कंपनी मालक आणि पोलिसांनी माहिती दिल्यानंतर अग्निशमन दलाला आगीची माहिती दिली.
आगीने धारण केले रौद्ररूप
आगीने दहा ते पंधरा मिनिटातच रौद्ररूप धारण केले़ बघता-बघता संपूर्ण कंपनीत आतून आग लागली़ त्यामुळे आगीचे लोळ उठत होते. तर आगीची माहिती मिळाल्यानंतर एमआयडीसी पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरिक्षक तसेच सहाय्यक फौजदार रामकृष्ण पाटील, अतुल पाटील, सचिन पाटील, मुदस्सर काझी, हेमंत काळसकर यांच्यासह पोलिसांच्या ताफ्याने मदतीसाठी घटनास्थळी धाव घेतली़ कंपनीचे मालक हरिष जगवाणी सुध्दा घटनास्थळी दाखल झालेले होते.
अखेर आग आटोक्यात
आगीची माहिती मिळाल्यानंतर क्षणाचा विलंब न करता महापालिकेच्या दोन अग्निशमनबंबाने घटनास्थळी रवाना झाले. त्यानंतर आगीवर पाण्याचा मारा करण्यात आला़ मात्र, आग आटोक्यात आणण्यात कर्मचाऱ्यांना अपयश येत होते. नंतर जैन कंपनीच्या अग्निशमन बंब पुन्हा दोन मनपाच्या अग्निशमन अशा एकूण पाच बंबाच्या मदतीने पाण्याचा मारा करित रात्री १.१५ वाजेच्या सुमारास आग आटोक्यात आली.यावेळी आमदार सुरेश भोळे हे देखील घटनास्थळी दाखल झालेले होते. या आगीत मात्र, लाखो रूपयांचे खोबरे, खोबरे तेल, तूप तसेच सरकी ढेप जळून खाक झाली. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात आगीची नोंद करण्यात आली आहे.