रेल्वेतून पडल्याने ऐनपूरचा इसम जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2019 11:43 AM2019-12-06T11:43:38+5:302019-12-06T11:44:07+5:30
जळगाव : सुरत येथे नोकरीला असलेले गोपाल रामभाऊ गाजरे (४०, रा. ऐनपूर, ता. रावेर) हे रेल्वेने गावी येत असताना ...
जळगाव : सुरत येथे नोकरीला असलेले गोपाल रामभाऊ गाजरे (४०, रा. ऐनपूर, ता. रावेर) हे रेल्वेने गावी येत असताना त्यांना रेल्वेतच फिट येऊन खाली पडल्याने ते गंभीर झाले. ही घटना गुरुवारी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास पाळधी, ता. धरणगावनजीक घडली. जखमीवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या संदर्भात जिल्हा रुग्णालयात जखमींच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, गोपाल गाजरे हे सुरत येथे नोकरीला असून ते सुट्टी घेऊन ऐनपूर येथे गावी येण्यासाठी ४ रोजी सुरत-भुसावळ पॅसेंजर रेल्वेने निघाले. ही रेल्वे धरणगाव तालुक्यातील पाळधीनजीक आल्यानंतर गाजरे यांना रेल्वेतच फिट आले व ते थेट रेल्वेतून खाली कोसळले. बराच वेळ ते तेथेच पडून होते.
अनोळखी म्हणून आणले जिल्हा रुग्णालयात
दुपारी अडीच वाजेच्या सुमारास गाजरे यांना कोणीतरी जिल्हा रुग्णालयात आणले. त्या वेळी वैद्यकीय अधिकारी रुग्णालयात इतर रुग्णांवर उपचार करीत असताना जखमीला आणणारे लगेच निघून गेले. त्यामुळे सुरुवातीला जखमीची अनोळखी म्हणून नोंद झाली. नंतर जखमीस त्यांची माहिती विचारली असता त्यांनी त्यांच्या सासऱ्यांचा संपर्क क्रमांक दिला. त्यावरून त्यांच्याशी संपर्क साधून माहिती देण्यात आली व जखमीची ओळख पटली. त्यानंतर संध्याकाळी त्यांचे मावस सासरे नाना लोळ हे रुग्णालयात पोहचले.
गाजरे यांच्या हाता-पायाला, चेहºयावर दुखापत झाली असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.