वातानुकूलित संस्कृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2018 12:54 PM2018-03-09T12:54:08+5:302018-03-09T12:54:08+5:30
‘एसी संस्कृती’चा दुसरा फटका बसला आहे तो काम करण्याच्या ठिकाणाला म्हणजे आॅफिसला. इथेही बंद केबिन, बंद दरवाजे, बंद संवाद आणि बंद मने. त्यातून येणारा कामाचा ताण, होणारी घुसमट, मन मोकळं करायला कोणीच नाही आणि मग परिणाम, सहकाºयांशी भांडणं, बॉसशी भांडणं, नोकरी सोडणं, नवी नोकरी शोधणं, शेवट नैराश्य आणि कधी कधी आत्महत्याही. तोच प्रकार प्रवासाच्या बाबतीत.
पूर्वी ‘केल्याने देशाटन, पंडित मैत्री, सभेत संचार मनुजा चातुर्य येत असे फार, असे म्हटले जात असे. पण प्रवासही तसाच होता. कसा?
झुकुझुकु झुकु आगीन गाडी,
धुराच्या रेषा हवेत काढी,
पळती झाडे पाहू या,
मामाच्या गावाला जाऊ या’.
पण आज धुरांच्या रेषा काढणारी आगीनगाडी नाही. पळती झाडे नाहीत आणि मामाचा गावही नाही.
पूर्वीच्या प्रवासात सर्वसाधारण डबा, त्यात येणारा गावोगावीचा, प्रांतोप्रांताचा पिसाट वारा, उघडे दरवाजे आणि उघड्या खिडक्या यातून होणारे त्या त्या ठिकाणचे निसर्गदर्शन, मानवी दर्शन, माणसांशी प्रवासात होणारा मनमुराद मोकळा संवाद, त्यातून उलगडत जाणारी संस्कृती हे सारेच माणसाला खूप काही शिकविणारे होते, चतूर करणारे होते. पण आता प्रवासही वातानुकूलित झालाय. म्हणजे परत तेच.
रेल्वे किंवा बसगाडीच्या कोचचे बंद दरवाजे. बंद खिडक्या आणि बंद मने. त्यातच आलेय इंटरनेट. सोशल मीडिया, त्यात संपूर्ण प्रवासभर ‘स्मार्ट फोन’कडे डोळे लावून बसलेली आणि कानात हेडफोन घातलेली माणसे.
समोरच्याचा चेहरा वाचणे, डोळ्यात बघणे, संवाद साधणे हे तर सोडाच; परंतु कुणी एखाद्या संकटप्रसंगी भयाने जीवाच्या आकांताने ओरडले तर आम्हाला ऐकूसुद्धा येणार नाही.
ही झाली आतली परिस्थिती, मग बाहेरच्या जगाशी, त्या-त्या प्रांताशी आमचा संपर्क येणे, त्यातून संस्कृतीचे दर्शन होणे आणि चातुर्य येणे या तर कल्पनेपलीकडच्या गोष्टी आहेत. आजचा आमचा प्रवास म्हणजे नुसती निरर्थक धावपळ, असे म्हटले तर वावगे ठरू नये.
‘एसी संस्कृती’चा सर्वात मोठा धोका म्हणजे पर्यावरणातील ‘ओझोन’ थराचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे आणि ओझोनची होणारी क्षती म्हणजे साक्षात सृष्टीचा, पृथ्वीचा नाशच.
आम्ही आमच्या भावी पिढीला काही देऊ शकू की नाही माहीत नाही, पण एक संकल्प प्रत्येकाने करण्याची गरज आहे. आपल्या पूर्वजांनी रक्ताचे पाणी करून, हाडाची काडे करून आपल्या सुखाचा, सर्वस्वाचा त्याग करून, प्रसंगी प्राणांचे बलिदान करून जे जे उत्तम, उदात्त आणि सुखकारक असे निर्माण केले आहे, मग ते पर्यावरण असेल, संस्कृती असेल, कुटुंब व्यवस्था- समाजव्यवस्था असेल ते उन्नत करता आले नाही.
वाढवता आले नाही, तरी किमान मी त्याचा नाश करणार नाही. त्याच्या नाशास स्वत: कारणीभूतही होणार नाही आणि इतर कोणास होऊ देणार नाही, एवढे केले तरी खूप होईल असो.
(उत्तरार्ध)
- विलास पाटील