जळगावात सुरु होणार वातानुकुलीत ई-बस सेवा, जागा व तांत्रिक बाबींचा प्रस्ताव तयार

By सुनील पाटील | Published: September 21, 2023 09:24 PM2023-09-21T21:24:09+5:302023-09-21T21:24:27+5:30

गुणांकनानुसार होणार शहरांची निवड, समिती गठीत

Air-conditioned e-bus service to start in Jalgaon | जळगावात सुरु होणार वातानुकुलीत ई-बस सेवा, जागा व तांत्रिक बाबींचा प्रस्ताव तयार

जळगावात सुरु होणार वातानुकुलीत ई-बस सेवा, जागा व तांत्रिक बाबींचा प्रस्ताव तयार

googlenewsNext

सुनील पाटील, लोकमत न्यूज नेटवर्क, जळगाव: केंद्र शासनाच्या पी.एम. ई-बस सेवा योजनेंतर्गत जळगाव शहरात वातानुकुलीत ई-बस सेवा सुरु होणार आहे. त्यासाठी ५० बसेसचा प्रस्ताव आहे.  यासाठी गठित करण्यात आलेल्या समितीने गुरुवारी ट्रान्सपोर्ट नगर व टी.बी.रुग्णालय या दोन जागांची पाहणी केली. या ठिकाणी तांत्रिकदृष्ट्या डेपो उभारता येणे शक्य असल्याचा अहवाल तयार करण्यात आला आहे. शुक्रवारी राज्य शासनाला अहवाल सादर केला जाणार आहे.

ई-बस सेवेसाठी जागेची अडचण निर्माण झाली होती. अनेक ठिकाणच्या जागा पाहिल्यानंतर आता महापालिकेच्या मालकीच्या दोन जागांचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. बस सेवा सुरु करण्यासाठी गुणांकन ठरविण्यात आलेले आहे. ३ लाख व त्यापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या देशातील १६९ व राज्यातील २३ शहरांमध्ये ही बस सेवा सुरु केली जाणार आहे. जागा, इलेक्ट्रीसीटी, शहरात बस सेवा नसणे यासह अनेक मुद्दे आहेत. जळगाव शहरासाठी ८० गुण ठरविण्यात आलेले आहेत. त्यात महापालिकेच्या मालकीची जागा व बस सेवा नसणे या दोन मुद्यावरच शहराची पहिल्याच टप्प्यात निवड होऊ शकते, अशी माहिती नोडल अधिकारी तथा सहायक आयुक्त गणेश चाटे यांनी दिली.

समिती गठीत

बस सेवेसंदर्भात शासनाच्या आदेशाने चार जणांची समिती गठीत करण्यात आली आहे. त्यात सहायक आयुक्त गणेश चाटे यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे. त्याशिवाय एस.टी.चे विभाग नियंत्रक भगवान जगनोर, महावितरणचे कार्यकारी अभियंता व्ही.बी.पाटील व इएसएल कंपनीचे प्रसाद होंगरे यांचा समावेश आहे.

वातानुकुलित बस सेवा

या योजनेंतर्गत चालविण्यात येणारी बस सेवा वातानुकुलित राहणार आहे. ३ लाख लोकसंख्येसाठी ५० बसेसचा निकष आहे. जळगाव शहरात १०० बसेस मिळू शकतात, मात्र महापालिकेने सुरुवातीला ५० बसेसचाच प्रस्ताव ठेवला आहे. मोठ्या बसेसला एका किलोमीटरसाठी २४ रुपये, मध्यमला २२ व लहान बसेसला २० रुपये खर्च येणार आहे. हा खर्च केंद्र व राज्य सरकार देणार आहे. मोठी बस १२ मीटर लांबीची तर लहान ७ मीटरची असणार आहे. शहराच्या २० किलोमीटर अंतरात बस सेवा चालविली जाणार आहे. यात वावडदा, शिरसोली, नशिराबाद, आसोदा, विदगाव, तरसोद, पाळधी, विद्यापीठ आदी मार्गांचा समावेश आहे.

Web Title: Air-conditioned e-bus service to start in Jalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव