भुसावळ रेल्वे स्थानकावर वातानुकूलित वेटिंग हॉलचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2020 03:38 PM2020-09-11T15:38:10+5:302020-09-11T15:40:08+5:30
रेल्वे स्थानकावर खासगी वातानुकूलित वेटिंग हॉलचे उद्घाटन करण्यात आले.
भुसावळ : रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक ४ वर मंडळातील प्रथम खासगी वातानुकूलित वेटिंग हॉल (प्रतीक्षालय) चे उद्घाटन व्हिडिओ लिंकद्वारे लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत ११ रोजी सकाळी ११:१५ वाजता करण्यात आले.
वातानुकूलित वेटिंग हॉलच्या व्हिडिओ लिंकद्वारे झालेल्या कार्यक्रमात खासदार रक्षा खडसे, आमदार संजय सावकारे, डीआरएम विवेककुमार गुप्ता यांच्यासह उच्च पदस्थ अधिकारी उपस्थित होते. स्थानकावर स्टेशन निर्देशक जी.आर. अय्यर यांनी प्रतीक्षालयाचे फीत कापून उद्घाटन केले.
भुसावळ जगातील पहिले खासगी प्रतीक्षालय
रेल्वे खासगीकरणाला आधीच सुरुवात झाली आहे. यासह स्थानकावरील प्रतीक्षालयाचेही खासगीकरणाला सुरुवात झाली आहे. भुसावळ मंडळातून पहिले खासगी प्रतीक्षालय भुसावळ फलाट क्रमांक ४ वर प्रवाशांच्या सेवेसाठी खुले झाले आहे.
प्रतीक्षालयात सोयीसुविधा
खासगी ठेकेदारामार्फत चालविण्यात येणाऱ्या प्रतीक्षालयात प्रति वयस्कर व्यक्तीस प्रति तास १५ रुपये, तर लहान मुलांसाठी आठ रुपये दर आकारले जाणार आहे. याशिवाय प्रतीक्षालयात चहा, कॉफी, मिनरल वॉटरची सुविधा करण्यात आली आहे. अर्थातच याचे शुल्क वेगळे द्यावे लागणार आहे. शिवाय बूट चकचकीत करण्यासाठी पाच रुपये, बॉडी मसाजसाठी ५० रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे.
दरम्यान, एकाच वेळेस सुमारे ६० ते ७० प्रवासी बसू शकतील, अशी व्यवस्था प्रतीक्षालयाालय करण्यात आली आहे. प्रवाशांच्या मनोरंजनासाठी दोन टीव्ही संच लावण्यात आलेले आहेत. सोफासेट व खुर्च्यांची सुविधा बसण्यासाठी करण्यात आलेली आहे.
ठेकेदाराकडून रेल्वे प्रशासन वार्षिक तीन लाख ७५ हजार आकारणार आहे.
यावेळी स्टेशन निदेशक गोपी अय्यर, मंडळ वाणिज्य निरीक्षक सुदर्शन देशपांडे, स्टेशन प्रबंधक मनोज श्रीवास्तव, यात्री सुविधा समिती सदस्य डॉ.राजेंद्र फडके, परीक्षित बºहाटे, डॉ.माधव धांडे उपस्थित होते. मंडल वाणिज्य प्रबंधक बी. अरुणकुमार यांनी आभार मानले.