कर्णबधिर दिव्यांगांना हवाय वाहन चालक परवाना ? मग जळगावला चला, सुरू झालीय तपासणी सुविधा
By अमित महाबळ | Published: September 17, 2022 09:06 PM2022-09-17T21:06:33+5:302022-09-17T21:07:12+5:30
जळगाव : वाहन चालक परवाना मिळण्यासाठी कर्णबधीर दिव्यांगांना लागणारी वैद्यकीय तपासणीची सुविधा जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (जीएमसी) ...
जळगाव : वाहन चालक परवाना मिळण्यासाठी कर्णबधीर दिव्यांगांना लागणारी वैद्यकीय तपासणीची सुविधा जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (जीएमसी) सुरू झाली आहे. या तपासणीत दिव्यांग व्यक्ती पात्र ठरल्यानंतर त्याला परिवहन विभागाशी (आरटीओ) संबंधित पुढील प्रक्रिया पार पाडता येणार आहे.
४० टक्क्यांच्या वर कर्णबधीरतेचा दोष असल्यास अशा व्यक्तींना आतापर्यंत वाहन चालक परवाना मिळत नव्हता. मात्र, आता शासन निर्णयानुसार कानाचे मशीन (हिअरिंग एड) लावून केलेल्या तपासणीत अपेक्षित निकषांवर दिव्यांग व्यक्ती पात्र ठरत असल्यास त्याला वाहन चालक परवाना मिळू शकणार आहे. ही तपासणी जीएमसीमध्ये शक्य झाली आहे. त्यासाठी अद्ययावत तंत्रज्ञान (एडेड ऑडिओग्राम व बेरा) नुकतेच उपलब्ध झाले आहे. या संदर्भात बरेच दिवस पाठपुरावा सुरू होता. बेरा मशीन बहिरेपणा किती आहे याची टक्केवारी काढते. त्यासाठी एक ते दीड तास वेळ लागतो. जीएमसीच्या बाह्य रुग्ण विभागातील खोली क्रमांक २०२, पहिला मजला या ठिकाणी सोमवार ते शनिवार, सकाळी ९ ते दुपारी १२ या वेळेत ही तपासणी केली जाणार आहे. मात्र, त्यासाठी कान, नाक व घसा विभागात पूर्व नोंदणी करणे आवश्यक आहे.
राज्यात चार ठिकाणी सुविधा, खान्देशात फक्त जळगाव
महाराष्ट्रात २३ शासकीय वैद्यकीय महाविद्यालये असून, आतापर्यंत केवळ मुंबई, पुणे व नागपूर या तीन ठिकाणी बेरा श्रवण तपासणी केली जात होती. या निवडक ठिकाणांमध्ये आता जळगाव जीएमसीचादेखील समावेश झाला आहे. रजत महोत्सवी वर्ष पूर्ण झालेल्या शासकीय महाविद्यालयांमध्येही अशी सुविधा नाही. खान्देशातील जळगाव, धुळे व नंदुरबार या तीनही जिल्ह्यांपैकी केवळ जळगावमध्ये या प्रकारची तपासणी शक्य झाली आहे.
कर्णबधीर दिव्यांगांची गैरसोय दूर
दिव्यांग प्रमाणपत्र व वैद्यकीय सुविधा मिळण्यासाठी ऑडिओमेट्री व बेरा या श्रवण तपासणी सुविधा रुग्णालयात सुरू झाल्या आहेत. यामुळे कर्णबधीर दिव्यांगांची गैरसोय दूर झाली आहे, अशी माहिती जीएमसीचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी दिली.
पूर्वनोंदणी आवश्यक
वाहन परवाना मिळविण्यासाठी कर्णबधीर दिव्यांगांना लागणारी वैद्यकीय तपासणी सुविधा सुरू करण्यात आली आहे. त्याचा दिव्यांग बांधवांनी लाभ घ्यावा. यासाठी पूर्वनोंदणी करणे गरजेचे आहे, अशी माहिती जीएमसीचे कान, नाक, घसा विभागाचे प्रमुख डॉ. अक्षय सरोदे यांनी दिली.