कोरोना काळातही विमानसेवेचे उत्स्फूर्त प्रतिसादाचे ‘उड्डाण’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:38 AM2021-01-13T04:38:10+5:302021-01-13T04:38:10+5:30
जळगाव : कोरोनामुळे लॉकडाऊन करण्यात आल्याने सुरूवातीला काही महिने विमानसेवा बंद होती. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर योग्य त्या खबरदारी घेण्याच्या ...
जळगाव : कोरोनामुळे लॉकडाऊन करण्यात आल्याने सुरूवातीला काही महिने विमानसेवा बंद होती. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर योग्य त्या खबरदारी घेण्याच्या सुचना देऊन शासनाने विमानसेवेला परवानगी दिल्यानंतर, सुरूवातीपासूनच जळगाव विमानतळावर प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनामुळे गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात ४०० ते ४५० पर्यंत असणारी प्रवाशांची संख्या, डिसेंबर महिन्यात थेट एक हजारांच्या वर पोहचली आहे. विशेष म्हणजे आठवड्यातुन तीनच दिवस विमानसेवा असतानांही प्रवाशांचा जळगाव विमान सेवेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.
गेल्या वर्षी देशभरात कोरोनाचा संसर्ग वाढल्यानंतर रेल्वे, बससह विमानसेवाही २३ मार्चपासून बंद करण्यात आली होती. त्यानंतर टप्प्या-टप्प्याने देशभरातील अंतर्गंत विमानसेवा सुरू झाल्यानंतर जळगावची विमानसेवाही जुलैमध्ये सुरू झाली होती. मात्र, जळगाव शहरात कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता, काही दिवसातच ही सेवा स्थगित करण्यात आली होती. विशेष म्हणजे या जुलै महिन्यांतही १६४ प्रवाशांनी प्रवास केला होता. ऑगस्ट पर्यंत ही सेवा स्थगितच होती. त्यानंतर सप्टेंबरपासून जळगावची विमानसेवा नित्यनियमाने सुरू असून, शासनाच्या सुचनेनुसार कोरोनामुळे आठवड्यातून बुधवार, शनिवार आणि रविवार या तीनच दिवशी विमानसेवा सुरू आहे. त्यातही मुंबईची विमानसेवा फक्त दर रविवारीच सुरू आहे. असे असतानांही जळगाव येथून विमानाने प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढतच असल्याने विमान कंपनीने दिलेल्या आकडेवारीवरुन स्पष्ट झाले आहे.
इन्फो
प्रवाशी संख्येत दर महिन्याला वाढ
गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यापासून जळगावची विमानसेवा सुरळीत सुरू असून, या महिन्यात फक्त ४३२ प्रवाशांनी प्रवास केला होता. तर ऑक्टोंबर महिन्यात दुपटीने वाढ होऊन, ७५९ प्रवाशांनी प्रवास केला असून, नोव्हेंबर महिन्यात तर प्रवासी संख्येने एक हजारांचा टप्पा ओलांडून १ हजार १२४ प्रवाशांनी प्रवास केला आहे. तर गेल्या डिसेंबर महिन्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर प्रवासी संख्या काहीशी कमी झाली असली तरी,१ हजार ४५ इतक्या प्रवाशांनी प्रवास केला आहे. जळगाव येथून विमानसेवा सुरू झाल्यापासून आतापर्यंत २१ हजारांहून अधिक प्रवाशांनी विमानसेवेचा लाभ घेतला आहे. दरम्यान, मुंबईच्या विमानसेवेला दररोजची परवानगी मिळाली तर, प्रवाशी संख्येत दहा पटीने वाढ होणार असल्याचे विमान कंपनीतर्फे सांगण्यात आले.
इन्फो :
नाईट लॅडिंगमुळे सेवा रद्दचे प्रमाण होणार कमी
नाईट लॅडिंगची सुविधा नसल्यामुळे, पूर्वी अनेकदा सेवा रद्द व्हायची, खराब हवामानामुळे जळगावला विमान न थांबता थेट अहमदाबादलाच रवाना व्हायचे. मात्र, आता नाईट लॅडिंगमुळे कमी दृश्यमानता असल्यावरही विमाने यशस्वीपणे उतरत आहे. त्यामुळे विमानसेवा रद्द होण्याचे प्रमाण कमी होऊन, प्रवाशांचा प्रवास अधिकच सुखकर होणार आहे.