विमानतळ प्रकरणात न्यायालयात दोषारोपपत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2019 11:05 AM2019-02-08T11:05:33+5:302019-02-08T11:05:47+5:30
प्रदीप रायसोनी यांच्यासह सात जणांचा समावेश
जळगाव :विमानतळ योजनेतील गैरव्यवहार व अनियमितता प्रकरणी दाखल गुन्ह्याच्या दोषारोपाची गुरुवारी न्यायालयात पडताळणी करण्यात आली. या प्रकरणातील संशयित प्रदीप ग्यानचंद रायसोनी, सिंधू विजय कोल्हे यांच्यासह सात जणांना शुक्रवारी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी वर्ग १ यांच्या न्यायालयात हजर राहण्याचे समजपत्र बजावण्यात आले आहे.
एक आठवडा आधी समजपत्र
या गुन्ह्याचे तपासाधिकारी तथा अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांनी या गुन्ह्यातील संशयितांना एक आठवडा आधीच जामीनदारासह न्यायालयात हजर राहण्याबाबत समजपत्र बजावले आहे. सकाळी ११ वाजता हजर राहण्याचे त्यात नमूद केले आहे. ऐनवेळी धावपळ नको म्हणून बच्छाव यांच्या तपास पथकातील सहायक पोलीस निरीक्षक विजय देशमुख यांनी गुरुवारी न्यायालयात दोषारोपपत्राची कागदपत्रे सादर केली. सायंकाळी उशिरापर्यंत या कागदपत्रांची पडताळणी सुरु होती.
सिंधू कोल्हे यांनी आजारपणाचे कागदपत्रे केली सादर
या गुन्ह्यातील संशयित माजी नगराध्यक्षा सिंधू विजय कोल्हे यांनी समजपत्र मिळाल्यानंतर तपासाधिकाऱ्यांकडे आजारपणाचे कागदपत्रे सादर केली आहेत. गेल्यावेळी देखील कोल्हे यांनी आजारपणाचे कागदपत्रे सादर केली होती.
सर्व संशयितांना जामीन मिळाल्यानंतर काही दिवसांनी त्या न्यायालयात हजर झाल्या होत्या.
२०१२ मध्ये दाखल होता गुन्हा
तत्कालिन नगरपालिकेतर्फे विमानतळ योजना राबविताना ३ कोटी १८ लाख रुपयांचा गैरव्यवहार व अनियमितता झाल्याची तक्रार तत्कालिन नगरसेवक नरेंद्र भास्कर पाटील यांनी दिल्यावरुन २०१२ मध्ये जळगाव शहर पोलीस स्टेशनला भाग ५, गु.र.नं.११०/२०१२ भादवि कलम ४०३, ४०६, ४०९, ४२० व ३४ प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता. तत्कालिन नगरपालिकेचे उच्चाधिकार समितीचे अध्यक्ष असलेले प्रदीप ग्यानचंद रायसोनी, नगराध्यक्ष सिंधू विजय कोल्हे, लक्ष्मीकांत तुकाराम चौधरी, चत्रभूज सोमा सोनवणे, मुख्याधिकारी पंढरीनाथ धोंडीबा काळे, धनंजय दयाराम जावळीकर व अॅटलांटा कंपनीचे संचालक राजू ए.बरोत यांच्याविरुध्द हा गुन्हा दाखल झाला होता.