अजिंठा घाटात महिलेला मारून फेकले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2018 04:13 PM2018-10-26T16:13:59+5:302018-10-26T16:17:09+5:30
अजिंठा घाटातील अजिंठा ते फर्दापूर राज्यमार्गावरील पहिल्या वळणावर २० ते ३५ वयोगटातील महिलेला मारून फेकून दिलेले असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
जळगाव : अजिंठा घाटातील अजिंठा ते फर्दापूर राज्यमार्गावरील पहिल्या वळणावर २० ते ३५ वयोगटातील महिलेला मारून फेकून दिलेले असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आहे. ही महिला जळगाव जिल्ह्यातील असल्याचा संशय पोलिसांना असून त्याच्या तपासासाठी औरंगाबाद ग्रामीणचे पोलीस गुरुवारी शहरात दाखल झाले.
अजिंठा घाटातील संरक्षण भिंतीच्या बाजूला हा मृतदेह आढळून आला आहे. या महिलेच्या अंगावरील कपडे काढून फेकून देण्यात आलेले आहेत. या महिलेची अंदाजे पाच फूट उंची आहे. उजव्या हाताच्या मनगटावर लाल रंगाचा दोरा तसेच निळसर व काळ्या रंगाची बांगडी असून त्यावर सोनेरी ठिपके आहेत. दोन्ही कानात पिवळ्या रंगाच्या धातूच्या वस्तू आहेत.
सिल्लोड पोलिसांच्या पथकाने शहरातील सर्व पोलीस ठाण्यांमध्ये हरविलेल्या महिलेबाबत माहिती घेतली. जिल्ह्यात कुठे नोंद आहे का? याची माहिती घेतली जात आहे.
हरविलेल्या महिलांची घेतली माहिती
ओळख पटू नये म्हणून संशयितांनी पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने हा मृतदेह अर्ध नग्न अवस्थेत फेकून दिला आहे. चार दिवसांपूर्वी अजिंठा घाटात अपघात झाला होता, तेव्हा पोलीस घटनास्थळी गेले असता त्यांना हा मृतदेह आढळून आला. ही महिला जळगाव जिल्ह्यातील असावी अजिंठा पोलीस स्टेशनचे सहायक निरीक्षक के.डी. आहेर यांचे एक पथक गुरुवारी जळगाव शहरात पाठविले.