अक्षय तृयीया : कृषी संस्कृतीचा चैतन्य सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2020 02:59 PM2020-04-27T14:59:58+5:302020-04-27T15:01:41+5:30

अक्षय तृतीया म्हणजे कृषी संस्कृतीचा एकप्रकारे चैतन्य सोहळाच असतो, याविषयी लोकमतच्या मंथन पुरवणीत लिहिताहेत खेडगाव, ता.भडगाव येथील वार्ताहर संजय हिरे....

Akshay III: Chaitanya ceremony of agricultural culture | अक्षय तृयीया : कृषी संस्कृतीचा चैतन्य सोहळा

अक्षय तृयीया : कृषी संस्कृतीचा चैतन्य सोहळा

Next

  शेतशिवारात वैशाख वणवा पेटलेला. रुक्ष वातावरणात शेती, शेतकरी व त्यावर आधारित कृषी व्यवस्थेला काहीसे चैतन्य घेऊन येणारा सण म्हणजे आखाजी अर्थात अक्षय तृतीया. वाडवडिलांनी, पूर्वजांनी जाणीवपूर्वक कृषी संस्कृतीचा हा चैतन्य सोहळा जपला आहे. याची सुरवात खरं तर चैत्र पौर्णिमेला होते.
शेतकरी कन्या गौरी (गवराई)ची स्थापना
काळा वावरमा झोपाया आंबा, थटे उतरनी गौराई रंभा
अशी कृषी संस्कृतीची श्रीमंती व श्रध्दा, भक्ती याची सांगड घालत करते. अक्षरशः पार्वती मातेला आपल्या पित्याच्या शेतात उतरवत चैतन्याचा मळा फुलवते. हा उत्सव थेट अक्षय तृतीयेपर्यंत सुरू असतो. यात शेतीवर आधारित सुतार, कुंभार आदी बारा बलुतेदार, गाव कारु-नारु, शेतकरी बाप व त्याचे वैभव, सालदार-शेतगडी या घटकांना गुंफत झोपाळ्यावर बसून उंचच-उंच झोका घेत गोडवे गायले जातात.
कृषी संस्कृतीत श्रमाला, कष्टणा-या हाताला पूज्य मानले जाते. म्हणूनच वाडवडिलांचे स्मरण पित्तरांच्या रुपात केले जाते. शेती, काळ्या आईच्या रुपात हा अमृत 'कुंभ, भावी पिढीच्या हाती सोपवत एकूणच कृषी वैभवाचे जतन केले जाते. म्हणूनच या दिवशी डेरगं म्हणजे घागरी भरीत पूजन केले जाते.
खरिपाचा धांडोळा
अक्षय तृतीया म्हणजे खरिप हंगामाचा पाठविलेला धांडोळाच होय. खरिप हंगामाला वर्षाचे सोन्याचे चाच म्हणूनच महत्व आहे. या दिवसात शेतीमशागतीला जोर आलेला असतो. शेतीअवजारांच्या निर्मितीतून सुतार, लोहार, कुंभार यांच्या हाताला काम मिळत असते. पूर्वी रब्बीत निघणाऱ्या शेतमालाचे खळे या दिवसात लावले जाई. मोबदल्याच्या रुपात धान्य खळे मागणा-या बारा-बलुतेदारांना मिळत असे. त्यांच्या पोटा-पाण्याची व्यवस्था होई. त्यांना पुरणपोळी, आमरस असे गोडधोड जेवण मिळत, श्रमसंस्कृतीला तृप्त केले जाई. यातून चैतन्य, उर्जा मिळत नव्या दमाने काळ्या आईची सेवा घडे.
शेतकरी-सालदारांचे 'मार्च एण्ड'
पूर्वीपासून खानदेशात अक्षय तृतीयेला शेतीकामासाठी वर्षभर सालदार म्हणून गडी ठरवण्याची पध्दत आहे. भलेही आर्थिक वर्षे म्हणून 'मार्च एण्ड:ला महत्व असले तरी शेतकरी-सालदारांचे अक्षय तृतीयेला साल, वर्ष संपते. खरिप हंगामाच्या दृष्टीने घातलेली ही सांगड होय. धान्य, कपडेलत्ते, गोडधोड जेवण व वर्षाचा मोबदला असे साल ठरवले जाते. भलेही आज सालदार नावालाच उरलेत तरीदेखील ही पध्दत अक्षय तृतीयेला सुरुच आहे.
आखाजीसारखा सण..
कृषी संस्कृतीत शेतकरी कन्येला केंद्रस्थानी ठेवत अक्षय तृतीयेला महत्व दिले जाते. म्हणूनच शेतकरी बापाच्या वावरातील आम्रवृक्षाखाली  दर आखाजीला गौरचे पाणी खेळणारी लेक मोठी होत सासरी जाते तेव्हा तिचे डोळे येणा-या अक्षय तृतीयेला माहेरच्या वाटेकडे लागलेले असतात. निम वृक्षाला बांधलेला उंचच झोका, गावरान आम्रवृक्ष हे तिला खुणावत असतात अन् मग नकळत तिच्या ओठावर खानदेशी गाण्याचे कडवे येतात.

उना आखाजीना सण, भाऊ ऊना मुरायी लेवाले..!
किंवा
आखाजीसारखा सण.., सण बाई टिपरना खेवाले...!
एकूणच अक्षय तृतीया हा सण  कुणासाठी विरगुंळा, कुणासाठी धांडोळा, कुणासाठी कळवळा असा कृषी संस्कृतीचा कुंभमेळा ठरावा.
लेखन-
-संजय हिरे, खेडगाव, ता. भडगाव, जि. जळगाव

 

 

Web Title: Akshay III: Chaitanya ceremony of agricultural culture

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.