अक्षय्यतृतीया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2018 11:15 AM2018-04-18T11:15:37+5:302018-04-18T11:58:49+5:30
- प्रा.डॉ.उषा सावंत
अहिराणी भाषिक परिसरात अक्षयतृतीयेला गौराईची पूजा करतात. चैत्र महिन्याच्या चावदसला (चतुर्दशी) खान्देशात ग्रामीण भागात घरोघरी गौर मांडली जाते. सासुरवाशिणी या उत्सवाला माहेरी येतात. अहिराणीत गौराईला गवराई म्हणतात. गौराई पार्वतीचे रूप आहे. गौर लाकडाची केलेली असते. गौराई ज्या कोनाड्यात किंवा पाटावर मांडतात तेथे मागच्या भिंतीवर रंगीत नक्षीकाम व चित्रे काढून अनेक प्रकारे सजवतात. गौराईला बाशिंग बांधतात. तिलाही सजवतात. मुली टिपऱ्या घेऊन व डोक्यावर तांब्या घेऊन नदीवर जातात. नदीवर गाणी गातात -
तापी काठनी चिकनमाती
इना वट्टा बांधु व।
हवु वट्टा चांगल्या ते
त्यावर सोजी दयू व।
हाई सोजी चांगली ते
सांजोºया करू व।
त्या सांजोºया चांगल्या ते
गौराईले देऊ व।
त्या सांजोºया
गौराईले देऊ व।
गौराई उनी माहेरले ते
आपन गाना गाऊत व।
मुली तांब्यात नदीचे पाणी भरतात. वरती आंब्याची पाच पाने ठेवून त्यावर कैरी ठेवतात. त्या आंब्याला डवना म्हणतात. मुली गातात -
याही भाऊ तुले मी गावू
वाटवर आंबा नको लावू
मनी गवराई लेकुरबाई
आंबानी रोंदय व्हुई
कढी उकाऊ मढी उकाऊ
ये रे संकर जेवाले
गवराई उनी लेवाले।
डोक्यावर तांब्या घेऊन येताना त्या गाणी गातात -
आथा आंबा तथा आंबा
कैरी झोका खाय व।
कैरी पडनी दगड फुटना
पानी झुय झुय वहाय व।
तठे रतन धोबी धोय
तठे कसाना बाजार व।
रतन धोबी धोय
तठे तोंडास्ना बाजार व ।
माये माले तोडा ली ठिवजो व
बंधूना हते धाडजो व ।
तोड्याच्या ऐवजी अनेक दागिन्यांची नावे घेऊन गातात -
नावे गोवून उदा. साखळ्या, चितांग, बजटीक, पुतळ्या, गाढले, एकदाणी इ. गीत लांबत जाते. पुन्हा दागिन्यांच्याच संदर्भात दुसरे गीत गातात -
आथी आमराई, तथी आमराई
मधमा पानी वहाय व ।
तठे मनी गवराई काय काय इसरनी व
तठे मनी गवराई पाटल्या इसरनी व
गौराईचा स्वयंपाक झाल्यावर टिपºयांच्या तालावर मुली गातात -
हारा ठेवू, घाºया रांधू
ये व गवराई जेवाले
गवराई बसनी जेवाले
तो संकर उना लेवाले
डेरा ठेवू पुºया रांधू
ये रे संकर जेवाले
संकर उना जेवाले तो
गवराई उनी लेवाले।
गौराईच्या उत्सवाला खान्देशात घरोघरी झोके बांधतात. घरासमोरच्या झाडाला बांधलेल्या झोक्यावर बसून दोघी जणी गातात -
पाटलावरनं नारय
नारय खुय खुय वाजे।
तठे मनी गवराईले
गवराईले काय काय जाते।
पुन्हा याही गीतात अनेक अलंकारांची नावे गोवली जातात. प्रत्येक गीतात चाल व आशय भिन्न असतो. उदा -
दारे सोनाना पिप्पय व माय,
सोनाना पिप्पय...।
त्याले काय चांदीन्या हालकड्या
व माय चांदीना हालकड्या।
त्याले काय सोन्याना पायना
व माय, सोनाना पायना
त्याले काय रेसमनी दोरी
त्यावर बसनार कोनता हरी
त्याला झोका देनार गवराई नारी
व माय गवराई नारी।
गवराई हे पार्वतीचे रूप आहे. गौर वर्ण असलेली ती गौर. अक्षय्यतृतीयेच्या दिवशी रात्री मुली सर्व गौराया एकत्र एके ठिकाणी जमतात. रात्रभर टिपºयांच्या तालावर तसेच झोक्यांवर गीते गातात. यालाच गौर जागवणे म्हणतात. अक्षय्यतृतीयेच्या दुसºया दिवशी म्हणजे बाशी आखाजीला गवराई विसर्जन करतात. त्या दिवशी दुपारी नदीच्या रस्त्याच्या किंवा रेल्वे रुळाच्या अल्याड पल्याड गावातल्या मुली नदी रस्ता किंवा रूळ यांच्या अल्याड पल्याड उभे राहून भांडतात. दोन्ही गावातील सगळी बायामाणसे हा सोहळा बघायला येतात. या सोहळ्याला ‘बार खेळणे’ असे म्हणतात. अहिराणी परिसरातील अक्षय्यतृतीया गवराईच्या उत्सवासह साजरी होते. गवराई ही उत्सव देवता आहे. सासुरवाशिणीला माहेरी यायला मिळते ते गवराईमुळे. म्हणून ती म्हणते -
उबगेल जीवले, दिवायी आखाजीना आधार।
वाट जोयस मायबाई, बंधूले धाड लवकर ।।
आखाजीना सन, नका परतावा मुराई।
बहिनीना बिगर, भाऊ किलावना जाई।।
आखाजीले वाट दखस मायबाई।
झोका खेयु, खेयु गवराई।।
- (साभार : अहिराणी साहित्यसोनियाच्या खाणी )