सोशल मीडियावर अक्षय तृतीया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2020 02:07 PM2020-04-27T14:07:30+5:302020-04-27T14:08:57+5:30

लॉकडाउनमुळे उदभवलेल्या परिस्थितीची सोशल मीडियावर अक्षय तृतीयाची चर्चा झाली, त्याविषयी लोकमतच्या मंथन पुरवणीत लिहिताहेत अमळनेर येथील वार्ताहर दिगंबर महाले...

Akshay Tritiya on social media | सोशल मीडियावर अक्षय तृतीया

सोशल मीडियावर अक्षय तृतीया

Next

सोशल मीडियावर अक्षय तृतीया

सोशल मीडियाकडे वाढत असलेली क्रेझ आता पारंपरिक, सामाजिक आणि कौटुंबिक नाती बदलत आहे. फेसबुक, व्हॉट्स अ‍ॅप, ट्विटर आणि इंस्टाग्राम यासारख्या सेवा तथा साइट वापरणार्‍या लोकांची संख्या सतत वाढत आहे. सोशल मीडियाचा वापर करणाऱ्यांमध्ये किशोरपासून वृद्धापर्यंत सर्व वयोगटातील लोकांचा समावेश आहे. दुर्गम भागातही फोर जी तंत्रज्ञान पोहोचल्यानंतर सोशल मीडिया वापर करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. सोशल मीडिया आता समाज आणि संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग बनत आहे. विशेषत: फेसबुक आणि व्हॉट्सअ‍ॅप हे आधुनिक जीवनाचा एक अविभाज्य भाग झाले आहेत. महानगरेच नाही तर
अगदी लहान शहरांमध्येही सोशल मीडिया शिवाय दररोजच्या जीवनाची कल्पना करणे कठीण आहे. आता सोशल मीडियामुळे आयुष्य खूप सोपे झाले आहे. यासह माहितीचा प्रवाहदेखील खूप वेगवान झाला आहे. देशात सध्या वाढत असलेल्या एकट्या कुटुंबाच्या युगात, संबंध मजबूत करण्यासाठी सोशल मीडिया महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, सोशल मीडिया शहरी कुटुंबांमधील संबंधांची संस्कृती पुन्हा परिभाषित करीत आहे. परंतु सध्या, शहरे आणि खेड्यांमध्ये विभागलेली कुटुंबे (म्हणजेच जे लोक रोजगाराच्या संबंधात शहरात आहेत, परंतु त्यांच्या संयुक्त कुटुंबातील लोक गावात राहतात) त्यांच्यात या प्रकरणात संक्रमण चालू आहे.
अक्षय तृतीयेला खान्देशात दिवाळीइतकंच महत्त्व असतं. माहेरवाशिणी माहेरी येतात, गोडधोड होतं. सालदार, बलुतेदार या दिवसापासून नवी सुरुवात करतात. पुरुषमंडळींना या दिवशी चक्क जुगार खेळण्याची परवानगी असते. खान्देशातील आखाजी हा सण सर्वासाठी संपूर्ण बंधनमुक्तीचा दिवस असतो. या दिवशी स्त्री, पुरुष, शेतकरी, शेतमजूर, आबालवृद्ध या सर्वाना पूर्ण स्वातंत्र्य लाभते. विवाहित स्त्री या दिवशी सणानिमित्ताने माहेरी आलेली असल्याने ती झोके खेळायला, गाणी गायला, झिम्मा-फुगडी खेळायला पूर्ण मुक्त असते. आबालवृद्धांना आमरस आणि पुरणाची पोळी यासह सांजरी आणि शेवया अशा मिष्ठान्नांची सुस्ती येते. ह्यआगारीह्ण या प्रथेतून या दिवशी पूर्वजांप्रती श्रद्धा भाव व्यक्त केला जातो. विशेष म्हणजे पूर्वी हे सारे काही हृदयात स्मृती रुपी बंदिस्त असे. आता या सर्व बाबी इव्हेंट स्वरूप सोशल मीडियावर व्हायरल केल्या जात आहेत. पुरणपोळी टाकताना, आंब्याचा रस करताना, आंबे खाताना भरलेले तोंड, झोका खेळताना, पत्ते खेळताना आपल्या आप्तस्वकीयाना लाईव्ह दाखविले जाते किंवा क्लिप्स करून पाठविल्या जातात. व्हाट्सएपवर शुभेच्छांचाही भडीमार असतोच. अक्षय तृतीयेला खान्देशभर प्रत्येक ओसरीवर किंवा झाडांवर झोका बांधलेला आढळतो. आखाजी हा सण शेतकरी, शेतमजूर, पुरुष आणि स्त्रिया यांचा जसा आहे तसा तो शेतकऱ्यांसाठी राबणाऱ्या बलुतेदारांचाही आहे. शिक्षण, यांत्रिकीकरण, आधुनिकीकरण, संगणक, दूरदर्शन, मोबाइल यांनी जीवन पार बदलून टाकले आहे. काळाच्या ओघात या आखाजीचे स्वरूपही बदलून गेले आहे. खेडय़ांतील नोकरीनिमित्ताने इतरत्र पांगलेले आता घराकडे येऊ शकत नाहीत तर कडक उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर काही जण येण्याचं टाळतात. मग सोशल मिडियाच्या माध्यमातून ही मंडळी आखाजीची अनुभूती घेते.
माहिती संसाधनांचा विस्फोट झाला आहे. माहितीच्या दृष्टीने जग हे खेडे बनले आहे. या तंत्रज्ञानामुळे माणूस जगाशी जोडला गेला असला तरी तो संवादाअभावी घरापासून नजीकच्या मंडळींपासून लांब चालला आहे हेही तितकेच खरे आहे. शहरीकरण, कौटुंबिक कलह, महागाई, वेळेचा अभाव आणि सारे काही सोशल मीडियाच्या साहाय्याने उरकण्याच्या मानसिकतेमुळे नात्यांमध्ये जिव्हाळा राहिलेला नाही. जेथे नात्यांमध्येच औपचारिकता शिल्लक राहिली आहे तेथे सण, उत्सवांचा काय विचार करावा. गावगाडा, शेती व्यवसाय हे संक्रमण अवस्थेतून जात आहेत. साहजिकच कालानुरूप आखाजी सण साजरा करण्यातही आमूलाग्र बदल झाला आहे.
वास्तव औरच असले तरी समाज माध्यमांवर सण, उत्सवांनिमित्त आनंदाच्या पर्वणीचे पीक बहरुन असते. इतर सण उत्सवांप्रमाणे अक्षय तृतीया सणानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. आठवणींना उजाळा दिला जात असून स्मरणातील आखाजी शब्दांतून व्यक्त केली जात आहे. आखाजीची लोकगीते प्रसारीत केले जात आहेत. एखाद्या घरातली आजीबाई आखाजी गीते सुस्वरे गात असतानाची व्हिडिओ क्लिप व्हायरल होत आहे. आखाजी निमित्ताने घरात सुरू असलेल्या सरसामानाच्या तयारीचे फोटोही शेअर करत औपचारिकता का असेना पण एकमेकांना सहभागी करून घेण्याचा अटृटाहास चालवला जात आहे.

लेखन-
-दिगंबर महाले, अमळनेर, जि. जळगाव

Web Title: Akshay Tritiya on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.