पुन्हा अक्षय तृतीयेचा मुहूर्त हुकला, लॉकडाऊनमुळे लग्न सोहळे रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:16 AM2021-05-14T04:16:16+5:302021-05-14T04:16:16+5:30
कोरोनाचा परिणाम : मंगल कार्यालयचालकांना फटका, आर्थिक गणित बिघडले लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : गेल्या वर्षाप्रमाणे यंदाही कोरोना संसर्गाच्या ...
कोरोनाचा परिणाम : मंगल कार्यालयचालकांना फटका, आर्थिक गणित बिघडले
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : गेल्या वर्षाप्रमाणे यंदाही कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन सुरू आहे. लग्न सोहळे व धार्मिक सोहळे साजरे करण्यावर अनेक निर्बंध लादण्यात आले आहेत. विशेषतः मे महिन्यातील अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर अनेक जण लग्न सोहळे करत असतात; मात्र गेल्या वर्षाप्रमाणे यंदाही लॉकडाऊनमुळे नागरिकांचा अक्षय तृतीयेचा मुहूर्त हुकला आहे. कोरोनामुळे लग्न सोहळे रद्द होत असल्याने, याचा परिणाम शहरातील मंगल कार्यालय व्यावसायिकांवरही झाला आहे. उत्पन्नाचा स्रोत बंद असल्यामुळे आर्थिक गणित कोलमडले आहे.
दरवर्षी सर्वाधिक लग्न सोहळे हे मे महिन्यात, विशेषतः अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर लागत असतात. त्यानुसार यंदाही मे महिन्यात विविध तारखांना लग्न सोहळ्याचे मुहूर्त होते. त्यानुसार अनेकांनी तयारीही केली होती; मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मे महिन्यात पूर्णतः लॉकडाऊन असल्यामुळे नागरिकांच्या विवाह सोहळ्यांवर विरजण पडले आहे. परिणामी, नागरिकांनी धूम-धडाक्यात लग्न न लावता साध्या पद्धतीने लग्न लावताना दिसून येत आहेत.
नियमांचा अडसर
शासनाने जाहीर केलेल्या लॉकडाऊनमध्ये नागरिकांना साध्या पद्धतीने फक्त २५ जणांच्या उपस्थितीत लग्न सोहळे करण्याचे आदेश दिले आहेत, तसेच यासाठी संबंधित तालुका अथवा जिल्हा प्रशासनाची परवानगी घेणे बंधनकारक आहे. विना परवानगी लग्न सोहळे करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत, तसेच गेल्या आठवड्यात २५ पेक्षा जास्त लोकांना आमंत्रित केल्याबद्दल अनेक ठिकाणी दंडात्मक कारवाई करण्यात आल्यामुळे नागरिक स्वतःहून लग्न सोहळे रद्द करत आहेत.
मे महिन्यातील मुहूर्त
यंदा मे महिन्यात २०, २१, २२, २४, २६, २८, ३० व ३१ मे हे मुहूर्त आहेत. या सर्व मुहूर्तांवर लग्न सोहळे करता येणार आहेत; मात्र कोरोनामुळे अनेक निर्बंध आल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
मंगल कार्यालयांचे गणित बिघडले
- जळगाव शहरात लहान व मोठी मिळून जवळपास ३५ ते ४० मंगल कार्यालये आहेत.
- मे महिन्यात ही सर्व मंगल कार्यालये बुकिंग झालेली असतात; परंतु यंदाही गेल्या वर्षाप्रमाणे कोरोनाची दुसरी लाट आल्याने या कार्यालयांचे बुकिंग झालेले नाही.
- कोरोनामुळे मंगल कार्यालयात लग्न सराई होत नसल्याने ऐन लग्न सराईत लाखो रुपयांचे उत्पन्न बुडत आहे.
- एकीकडे उत्पन्न बंद असताना, दुसरीकडे कार्यालयाची सफाई, सुरक्षा व लाईट बिलावर दर महिन्याला ठराविक खर्च येत असल्याने, हा खर्च मंगल कार्यालयचालकांना घरून करावा लागत आहे. त्यामुळे मंगल कार्यालयचालकांचे आर्थिक गणित कोलमडले आहे.
यंदा कर्तव्य नाही..
कोरोनामुळे यंदाही शासनाने २५ लोकांच्या उपस्थितीत लग्न करण्याचे आवाहन केले आहे. अन्यथा मुलाचे लग्न धूमधडाक्यात करणार होतो; मात्र नियमांचे पालन करून मुलाचे लग्न करणार आहे.
- डोंगर पाटील, वर पिता.
-----------------
गेल्या वर्षी कोरोनामुळे मुलीचे लग्न केले नाही; मात्र यंदाही तीच परिस्थिती असल्याने साध्या पद्धतीनेच लग्न करावे लागणार आहे. कोरोनामुळे लग्नातील आनंद काहीसा कमी होणार आहे.
- संजय सोनजे, वधू पिता.