ठिकठिकाणी १ लाख ८० हजाराची गावठी दारु जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2019 09:57 PM2019-12-05T21:57:17+5:302019-12-05T21:58:00+5:30
एमआयडीसी, शनिपेठ, तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत कारवाई
जळगाव : शहरातील वेगवेगळ््या भागात पोलिसांनी गावठी दारु हातभट्टींवर धाड टाकून एक लाख ७९ हजार ५०० रुपयांची गावठी दारु जप्त करण्यात आली. या प्रकरणी एकूण दोन जणांना ताब्यात घेण्यात आले असून एक महिला फरार झाली आहे. ही कारवाई गुरुवारी वेगवेगळ््या ठिकाणी करण्यात आली.
शहरात सर्व पोलीस ठाण्यांमध्ये अपर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके, पोलीस उपअधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांच्या आदेशानुसार ‘वॉशआॅऊट’ मोहिम सुरु आहे. त्यानुसार एमआयडीसी, शनिपेठ व तालुका पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या हद्दीत गावठी हातभट्टी दारु अड्ड्यांवर छापा टाकण्यात आला. यात एमआयडीसी पोलिसांनी दीड लाख, तालुका पोलिसांनी २६ हजार, तर शनिपेठ पोलिसांनी ३४०० रुपयांची गावठी दारु जप्त केली.
एमआयडीसी पोलिसांनी कंजरवाडा येथील गावठी दारू अड्ड्यावर छापा टाकून १ लाख ५४ हजार ८०० रूपयांची गावठी दारू व रसायन तसेच दारू बनविण्याचे साहित्य जप्त केले़ या प्रकरणी एका जणास ताब्यात घेण्यात आले.
कंजरवाडा येथे चेतन देविदास बाटूंगे व चमनबाई गुड्ड्या माचरेकर हे अवैधरित्या गावठी दारू विक्री करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती़ त्यानुसार एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक रणजीत शिरसाठ, अतुल वंजारी, दीपक चौधरी, अशोक सनगत, सचिन चौधरी, स्वप्निल पाटील, पंकज सापकर, परमेश्वर पाटील, हर्षवर्धन सपकाळे आदींनी कंजरवाडा येथे दारू अड्ड्यावर धाड टाकली.
या कारवाईत पोलिसांनी चेतन देविदास बाटुंगे यांच्याकडून ८१ हजार ६०० रुपये किमतची गावठी हात भट्टी दारु, रसायन व चमनबाई गुड्ड्या माचरेकर या महिलेकडून ७३ हजार २०० रुपये किमतीची गावठी दारु, रसायन असा एकूण १ लाख ५४ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यात संशयित चेतन बाटुंगे यास ताब्यात घेतले़
भोलाणे, खेडी येथे २६१०० रुपयांची गावठी दारु जप्त
तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश चव्हाण, पोलीस उपनिरिक्षिक कदीर तडवी, पोलीस नाईक विलास शिंदे, पो. कॉ. मिथून पाटील, धर्मेंद्र ठाकूर यांच्या पथकाने भोलाणे तसेच खेडी बुद्रुक येथील गावठी अड्ड्यांवर कारवाई केली. यात भोलाणे येथे दोन ठिकाणी कारवाई करुन २५ हजार ५०० रुपयांची गावठी दारु व साहित्य जप्त केले. हिंमत भास्कर कोळी, गणेश श्यामराव कोळी रा. भोलाणे या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच खेडी बुद्रुक येथे ६०० रुपयांची गावठी दारु जप्त करण्यात येवून महिलेवर कारवाई करण्यात आली.
वाल्मिकनगरातून ३४०० रुपयांची गावठी दारु जप्त
शनिपेठ पोलिसांनी वाल्मिक नगर भागातील गावठी दारुच्या अड्ड्यावर छापा टाकून १ हजार ८०० रूपयांची ३५ लिटर दारू जप्त केली. या प्रकरणी गावठी दारु विक्री करणाºया एका तरुणाला ताब्यात घेतले तर महिला फरार झाली.
वाल्मिकनगर परिसरातील दोन ठिकाणी अवैधरित्या गावठी दारुची हातभट्टी सुरू असल्याची माहिती शनिपेठ पोलिसांना मिळाली. त्यानुसार गुन्हे शोध पथकातील सहाय्यक फौजदार दिनेशसिंग पाटील, पोलीस नाईक अभिजित सैंदाणे, महिला पोलीस कॉन्स्टेबल सुवर्णा पाटील यांच्या पथकाने कारवाई केली. यावेळी खटाबाई आनंदा सोनवणे (वय ४५, रा. वाल्मिक नगर) या दारु विक्री करणारी महिला फरार झाली. पोलिसांनी घटनास्थळाहून १ हजार ८०० रूपयांची ३५ लिटर दारू जप्त केली आहे.
वाल्मिकनगर परिसरातच दुसºया घटनेत पो.कॉ. संजय शेलार, अमोल विसपूते, राहुल घेटे यांच्या पथकाने कारवाई केली. शरद रामदास बाविस्कर (वय ३५, रा. वाल्मिक नगर) यास ताब्यात घेतले. त्याच्या ताब्यातील १ हजार ६०० रूपयांची दारू हस्तगत केली. दोन्ही घटना प्रकरणी शनिपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.