मदिरेमुळे खाकी व खादीवर पुन्हा डाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2020 12:06 PM2020-04-26T12:06:49+5:302020-04-26T12:07:20+5:30

जग कोरोनाशी झगडत असताना जबाबदार मंडळी स्वार्थात रममाण, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षकांची धाडसी व कौतुकास्पद भूमिका, लॉकडाऊननंतरचा सर्वच दुकानांमधील मद्यसाठ्याची तपासणी करा

Alcohol stains khaki and khadi again | मदिरेमुळे खाकी व खादीवर पुन्हा डाग

मदिरेमुळे खाकी व खादीवर पुन्हा डाग

googlenewsNext

मिलिंद कुलकर्णी
लोकशाहीच्या चार स्तंभांकडून अपेक्षाभंग होऊ लागल्याने जनतेचा भ्रमनिरास होऊ लागला आहे. प्रत्येक स्तंभात मोजके लोक भ्रष्ट असले तरी इतर मूकदर्शक, निष्क्रिय राहत असल्याने संपूर्ण क्षेत्राविषयी जनमानस नकारात्मक होत आहे. संपूर्ण जग कोरोनाशी लढत असताना काही मंडळींकडून असमर्थनीय घटनांचे भांडवल करणे, शेरेबाजी करीत वाद ओढवून घेणे, राजकीय वादविवाद घडविणे असे प्रकार होत आहे. याचबरोबर आपत्तीकाळातही काही लोक स्वार्थाला लगाम घालू शकत नाही. उलट आपत्ती ही इष्टापत्ती मानून स्वत:चे खिसे भरण्याचे उद्योग करीत आहेत.
हातावर पोट असलेल्या गोरगरिबांसाठी सरकारने तीन महिन्यांचे धान्य देण्याचा निर्णय घेतला. गरिबाच्या तोंडातील घास हिसकावण्याची प्रवृत्ती याकाळातही दिसून येत आहे. काही रेशनदुकानदार, शासकीय अधिकारी यांच्या संगनमताने धान्याची परस्पर विल्हेवाट लागल्याचे दिसून आले. काही दुकानदारांचे परवाने निलंबित वा रद्द झाले.
लॉकडाऊनमुळे दारु दुकाने बंद आहेत. ४० दिवसांच्या सक्तीच्या लॉकडाऊनमुळे मद्यपींची सवय सुटण्यास चांगली संधी आहे. परंतु, समाजातील काही स्वार्थी मंडळींमुळे या काळातही दारुचे उत्पादन आणि विक्री सुरु आहे. पोलीस दल, उत्पादन शुल्क विभाग कारवाई करीत असले तरी त्यांना मर्यादा आहेत. पण जळगावच्या राज वाईन आणि नशिराबादच्या क्रिश ट्रेडर्समधून सर्रास दारुविक्री केली जात असल्याचे उघड झाले. लॉकडाऊन असतानाही एवढे धाडस करण्यामागे कुणी शक्ती असली पाहिजे, हा प्रशासनाचा कयास खरा निघाला. माजी आमदाराच्या पत्नीची भागिदारी या दुकानात आहे, त्यामुळे अमळनेरसारख्या अनेक दुकानदारांना ‘चोरीचा मामला’ सुरक्षित वाटलेला दिसतो. असे प्रकार घडू नये, म्हणून ज्यांच्यावर जबाबदारी आहे, त्या कार्यक्षेत्राचे पोलीस निरीक्षक आणि पोलीस दलातील ‘दादा’ मंडळी म्हणून ज्यांची ओळख आहे, असे कर्मचारी यांचाच सहभाग या प्रकरणात आढळून आला. खाकी आणि खादीतील स्वार्थांधांची युती झाली तर काय घडू शकते, याचा हे प्रकरण म्हणजे उत्तम नमुना आहे. अर्थात हे हिमनगाचे टोक आहे. खान्देशातील तिन्ही जिल्ह्यांमध्ये या प्रकरणाची पाळेमुळे रुजली असल्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वच दुकानांच्या मद्यसाठ्याची तपासणी करा, अशी जी मागणी होत आहे, त्याचा गांभीर्याने विचार आणि कृती करायला हवी.
मेहरुणच्या शेतात याच काळात नगरसेवक, वाळू माफिया आणि पोलीस कर्मचारी यांची रम आणि रमीची रंगीत पार्टी रंगली. पुन्हा एकदा अभद्र युती झाली की, कायदा आणि नियम धाब्यावर बसविले जातात, हे दिसून आले. डॉ.अविनाश ढाकणे, डॉ.पंजाबराव उगले, नितीन धार्मिक या अधिकाऱ्यांनी कठोर कारवाई करीत प्रशासनाचे मनोबल वाढविले आहे.

जळगावातील राज वाईन व क्रिश ट्रेडर्समधून लॉकडाऊन काळात बंदी असताना मद्यसाठा विक्री केल्याच्या प्रकरणामुळे काही राजकारणी मंडळी व पोलीस दलातील काही ‘वजनदार’ कर्मचारी यांची अभद्र युती उघड झाली आहे.
जगाला संकटात लोटणाºया ‘कोरोना’शी
राजकीय, प्रशासकीय व पोलीस दलातील सहकारी लढत असताना त्यांच्यातील काही स्वार्थी मंडळी मात्र अप्पलपोटेपणा करीत असल्याचे मद्यसाठा प्रकरणामुळे लक्षात आले. अमळनेरच काय आता संपूर्ण खान्देशातील दारु दुकानांच्या साठ्याच्या चौकशीची मागणी होऊ लागली आहे. जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या भूमिकेचे कौतुुक आहे.

Web Title: Alcohol stains khaki and khadi again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव