यंत्रणांना सतर्कतेचा इशारा, मुख्यालय सोडू नका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2020 12:04 PM2020-06-04T12:04:10+5:302020-06-04T12:04:24+5:30
‘निसर्ग’च्या पार्श्वभूमीवर दक्षता : निम्म्याहून अधिक जिल्हा प्रभावित होण्याची शक्यता
जळगाव : निसर्ग चक्रीवादळाच्या प्रभावामुळे जिल्ह्यात ४ जून रोजी ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तविला जात असून त्या पार्श्वभूमीवर दक्षता म्हणून जिल्ह्यातील सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याचा इशारा जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आला आहे.
या संदर्भात जि.प., पोलीस प्रशासन, सर्व प्रांत कार्यालय तसेच सर्व तहसीलदारांना पत्र देण्यात आले आहे. या वादळामुळे जळगाव, अमळनेर, चाळीसगाव, पारोळा, भडगाव, पाचोरा, एरंडोल, चोपडा, यावल हे तालुके प्रभावित होण्याची शक्यता असून उपाययोजना म्हणून जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालयातील नियंत्रण कक्ष २४ तास कार्यान्वित ठेवण्याचे निर्देशही देण्यात आले आहे. दरम्यान, या चक्रीवादळाचे गांभीर्य लक्षात घेता जिल्हाभरात दक्षता घेण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले असून चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर विभाग प्रमुखांनी पुढील सूचना मिळेपर्यंत आपापले मुख्यालय सोडू नये, असे निर्देशही देण्यात आले आहेत.
जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांच्या आदेशान्वये निवासी उप जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल पाटील यांनी ५ जूनपर्यंत सर्व तहसील कार्यालयातील नियंत्रण कक्ष २४ तास कार्यान्वित ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. कोठेही काही घडल्यास सतर्कता राहावी म्हणून या नियंत्रण कक्षात रोज रात्री दर दोन तासांनी तपासणी करून घेतली जाणार आहे.
नऊ तालुक्यांना धोका
या वादळामुळे जळगाव, अमळनेर, चाळीसगाव, पारोळा, भडगाव, पाचोरा, एरंडोल, चोपडा, यावल हे तालुके प्रभावित होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या सर्व तालुक्यांसह इतरही सर्वच तालुक्यांमध्ये खबरदारीच्या सूचना दिल्या आहेत.
नदी, धरणे, तलाव असलेल्या भागात अलर्ट
चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर वरील यंत्रणांनी त्यांच्या अखत्यारित येणाऱ्या सर्व यंत्रणांना या बाबत सावधानता बाळगण्याच्या सूचना द्याव्या, असेही कळविण्यात आले आहे. विशेषत: तालुक्यातील नदी, धरणे, तलाव असलेल्या भागातील तलाठी, ग्रामसेवक, पोलीस पाटील यांना सतर्क राहण्याच्याही सूचना दिल्या आहेत. जिल्हाभरात सर्व यंत्रणांनी शोध व बचाव साहित्य सुस्थितीत ठेवून शोध व बचाव गट कार्यरत ठेवण्याचे निर्देश दिले आहे.
विभाग प्रमुखांनी मुख्यालय सोडू नये
जिल्ह्यातील सर्व यंत्रणांनी जिल्हा नियंत्रण कक्षाच्या सातत्याने संपर्कात राहून कोणतीही दुर्घटना घडल्यास जिल्हा नियंत्रण कक्षाला त्वरित माहिती द्यावी तसेच चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर विभाग प्रमुखांनी पुढील सूचना मिळेपर्यंत मुख्यालय सोडू नये, असे निर्देश दिले आहेत.