‘श्री गजानन विजय’ पोथीचे सर्व २१ अध्याय एकाच दिवसात मुखोद्गत सादर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2019 11:46 AM2019-12-13T11:46:10+5:302019-12-13T11:46:39+5:30
पारायणात भाविक तल्लीन
जळगाव : सर्व धार्मिक ग्रंथांचा सार सामावलेल्या ‘श्री गजानन विजय’ या दास गणू महाराज रचित पोथीतील सर्व २१ अध्याय एकाच दिवसात सादर आणि तेही मुखोदगत, असा योग भाविकांनी अनुभवला तो मार्गशीर्ष पौर्णिमा व गुरुवार अशा शुभयोगावर शहरातील हरेश्वरनगरात. निमित्त होते मधुवंती देशमुख आणि दिवाकर देव या भावंडांनी आयोजित केलेल्या संत गजानन महाराज यांच्या ‘श्री गजानन विजय’ पोथी पारायणाचे. या वेळी ‘शेगावीच्या महंता, तुज काय मागू आता.....’ अशा श्री गजानन महाराज यांच्या एकाहून एक सादर करण्यात आलेल्या साक्षात्काराच्या ओवीमध्ये भाविक तल्लीन होऊन गेले होते.
श्री दत्त जयंती महोत्सव व त्यात गुरुवारीच आलेली मार्गशीर्ष पौर्णिमा या योगावर हरेश्वर नगरमध्ये श्री गजानन विजय पोथीचे पारायण आयोजित करण्यात आले होते. एकाच भक्ती परंपरेतील गजानन महाराज, रामदास स्वामी, नृहसिंह सरस्वती यांचे साक्षात्कार, चमत्कार तसेच त्यांच्या जीवनातील विविध प्रसंगांचा उल्लेख असलेल्या श्री गजानन विजय या पोथीतून भक्ती मार्गाची जागृती होते व पारायण तसेच वाचनाने घरातील समस्या मार्गी लागतात, अशी भाविकांची श्रध्दा आहे. अशा या पारायणसाठी हरेश्वर नगरातील दिवाकर देव यांच्या निवासस्थानी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
२१ अध्याय मुखोदगत
श्री गजानन विजय या पोथीचे २१ अध्याय आहेत. त्याचे कोठे पारायण होत असताना पोथीचे वाचन करीत पारायण होते. मात्र जळगावात आयोजित या पारायणमध्ये ठाणे येथील विद्या पडवळ यांनी मुखोदगत पारायण केले. सर्व २१ अध्यायातील शब्द न शब्द त्यांचे तोंडपाठ आहेत, हे विशेष.
नऊ तासात सर्व अध्याय पूर्ण
या पोथीचे पारायण करताना सात दिवसाचे आयोजन असते व दररोज दोन किंवा तीन अध्याय होतात. मात्र विद्या पडवळ यांनी एकाच दिवसात सर्व २१ अध्याय सादर केले. गुरुवारी सकाळी साडे आठ वाजता पारायणाला सुरुवात होऊन संध्याकाळी साडे पाच वाजता समाप्ती झाली. सलग नऊ तास पडवळ यांनी पारायण करीत २१ अध्याय पूर्ण केले.
पारायण दरम्यान पडवळ यांनी संत गजानन महाराज यांच्या जीवनातील विविध प्रसंग हुबेहुब सादर केले. या पारायणात भाविक शेवटपर्यंत खिळून राहिले. पारायणानंतर सर्व भाविकांना श्री गजानन विजय पोथी भेट देण्यात आली व भाविकांनी प्रसादाचा लाभ घेतला.