चाळीसगाव पालिकेत सत्ताधारी भाजपाला आघाडीचा चेकमेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2021 05:56 PM2021-01-28T17:56:09+5:302021-01-28T18:03:56+5:30
चाळीसगाव पालिकेच्या विषय समितीच्या सभापती निवडीत विरोधी शहर विकास आघाडीने पाचही पदे आपल्याकडे ठेवत सत्ताधारी भाजपाला धक्का दिला.
लोकमत न्यूज नटवर्क
चाळीसगाव : पालिकेच्या विषय समितीच्या सभापती निवडीत विरोधी शहर विकास आघाडीने पाचही पदे आपल्याकडे ठेवत सत्ताधारी भाजपाला पालिकेच्या शेवटच्या वर्षाच्या कार्यकाळात चेकमेट दिला आहे. आघाडीचे तिघे सभापती बिनविरोध निवडून आल्यानंतर आघाडीच्याच दोघांनादेखील ईश्वरचिठ्ठीचा कौल मिळाला. ही प्रक्रिया गुरुवारी दुपारी १२ वाजता पालिकेच्या सभागृहात पार पडली.
समितींमधील सदस्य संख्या निवडीनंतर शिवसेनेच्या दोघा सदस्यांनी प्रत्येक समितीत समावेश व्हावा, यासाठी आग्रह धरला होता. जिल्हाधिकाऱ्यांनी विषय समिती सभापती निवडीचा कार्यक्रम जाहीर केल्यानंतर शिवसेनेच्या सदस्या विजया प्रकाश पवार यांनी याविरोधात औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली होती. जिल्हाधिकाऱ्यांनी दोघाही सदस्यांना प्रत्येकी दोन समितींमध्ये स्थान दिल्यानंतर गुरुवारी विषय समिती सभापतींची निवड प्रक्रिया पार पडली.
भाजपा अल्पमतात, आघाडीचे बहुमत
मध्यंतरी भाजपाच्या सत्तेच्या तंबूत असणाऱ्या दोन अपक्षांसह शिवसेनेच्या दोन्ही सदस्यांनी भाजपाला सोडचिठ्ठीत देत आघाडीचा झेंडा हाती घेतला. यामुळे भाजपाची सत्ता अल्पमतात आली. आघाडीने बहुमत एकवटले. विषय समिती सभापती निवडीत याचा प्रत्यय स्पष्टपणे आला. पाचही सभापतीपदे आघाडीने राखली आहे.
यांची झाली सभापतीपदी निवड
सकाळी १० ते १२ यावेळेत नामनिर्देशन पत्र भरले गेले. यात शिक्षण समितीसाठी भाजपाचे तायडे यांनी माघार घेतल्यानंतर आघाडीचे सूर्यकांत ठाकूर यांची निवड झाली. बांधकाम समितीसाठी आघाडीचे शेखर देशमुख यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड घोषित करण्यात आली. महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदासाठी आघाडीच्या वंदना चौधरी यांचाच अर्ज असल्याने त्यांचीही बिनविरोध निवड झाली. आरोग्य समितीसाठी अपक्ष सदस्या सायली जाधव यांना तर पाणीपुरवठा समितीसाठी आघाडीचे दिपक पाटील यांना ईश्वरचिठ्ठीचा कौल मिळाला. आरोग्य समितीसाठी भाजपाकडून घृष्णेश्वर पाटील तर पाणीपुरवठा समितीसाठी भाजपाचे मानसिंग राजपूत यांनी अर्ज दाखल केले होते. प्रत्येकी पाच अशी समान मते मिळाल्याने प्रणव चौधरी या आठवर्षीय बालकाच्या हातून ईश्वर चिठ्ठी काढण्यात आली.
शिवसेना सदस्याचे भाजपासाठी मतदान
आरोग्य सभापतीपदासाठी सायली जाधव व घृष्णेश्वर पाटील यांच्यात निवडणुक झाली. यात शिवसेनेच्या सदस्या विजया प्रकाश पवार यांनी भाजपाचे घृष्णेश्वर पाटील यांना मतदान केले. शिवसेनेचे दुसरे सदस्य शामलाल कुमावत हे मात्र आघाडीसोबत आहे.
दोघे अपक्ष व शिवसेनेचा एक सदस्य आघाडीकडे गेल्याने विषय समिती सभापती निवडीत अपयश आले. निवड प्रक्रिया बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न केले. तथापि सदस्यांमध्ये एकमत होऊ शकले नाही.
- संजय पाटील,गटनेते भाजपा, चाळीसगाव पालिका