चारही प्रभाग समित्या भाजप बंडखोरांच्या ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2021 04:06 AM2021-07-13T04:06:08+5:302021-07-13T04:06:08+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : महापालिकेतील सत्ता भाजपच्या हातातून खेचल्यानंतर आता भाजपच्या बंडखोरांनी महापालिकेच्या प्रभाग समिती सभापतीपदाच्या निवडणुकीत चारही ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : महापालिकेतील सत्ता भाजपच्या हातातून खेचल्यानंतर आता भाजपच्या बंडखोरांनी महापालिकेच्या प्रभाग समिती सभापतीपदाच्या निवडणुकीत चारही जागांवर विजय मिळवत, प्रभाग समित्याही भाजपच्या हातातून हिसकावल्या आहेत. सोमवारी महापालिकेत ऑनलाइन पद्धतीने प्रभाग समित्यांच्या सभापतीपदाची निवडणूक पार पडली. यामध्ये प्रभाग समिती १ मध्ये प्रा.सचिन पाटील यांची बिनविरोध, तर प्रभाग २ मध्ये प्रवीण कोल्हे, प्रभाग समिती ३ मध्ये रेखा पाटील तर प्रभाग समिती ४ मध्ये शेख हसीना या विजयी ठरल्या.
प्रभाग समिती सभापतीपदासाठीच्या निवडणुकीच्या आधी झालेल्या घडामोडींमुळे ही निवडणूक भाजप बंडखोर नगरसेवकांनी चांगलीच प्रतिष्ठेची केली होती. त्यात भाजपनेही कोणत्याही प्रभाग समितीमध्ये बहुमत नसतानाही आपले उमेदवार दिल्यामुळे निवडणूक चुरसीची होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, प्रभाग समिती ३ व ४ वगळता इतर प्रभाग समित्यांमध्ये भाजप बंडखोरांनी भाजप नगरसेवकांचा ‘क्लिनस्विप’ केले आहे, तर प्रभाग ३ व ४ मध्ये भाजपने काही प्रमाणात टक्कर दिली. मात्र, तरीही भाजप नगरसेवकांचा पराभव झाला. मनपाच्या दुसऱ्या मजल्यावरील सभागृहात जिल्हाधिकारी तथा पीठासीन अधिकारी अभिजीत राऊत यांच्या उपस्थितीत ही निवडणूक प्रक्रिया पार पडली. यावेळी अतिरिक्त आयुक्त विद्या गायकवाड व नगरसचिव सुनील गोराणे आदी उपस्थित होते.
एमआयएम उमेदवारांचे अर्ज बाद, बंडखोरांना दिली साथ
१. प्रभाग समिती क्रमांक १ मध्ये प्रा.सचिन पाटील यांच्या व्यतिरिक्त एकही अर्ज दाखल झाला नसल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
२. प्रभाग समिती क्रमांक २ मध्ये भाजप बंडखोरांकडून प्रवीण कोल्हे, तर भाजपकडून मुकुंदा सोनवणे यांना उमेदवारी देण्यात आली होती. या जागेसाठी झालेल्या मतदानात प्रवीण कोल्हे यांना १३ तर मुकुंदा सोनवणे यांनी ७ मते मिळाली. सोनवणे यांचा ६ मतांनी पराभव झाला.
३. प्रभाग क्रमांक ३ मध्ये एका जागेसाठी चार अर्ज दाखल झाले होते. त्यामुळे या समितीमध्ये काट्याची लढत होईल, अशी शक्यता होती. मात्र, एमआयएमच्या शेख सईदा व सुन्ना बी. देशमुख यांचे अर्ज बाद ठरल्यामुळे भाजपचे उमेदवार धीरज सोनवणे व बंडखोरांच्या उमेदवार रेखा पाटील यांच्यात लढत झाली. यामध्ये एमआयएमच्या तिन्ही नगरसेवकांनी भाजप बंडखोर उमेदवार रेखा पाटील यांना मतदान केल्यामुळे रेखा पाटील यांनी धीरज सोनवणे यांचा १ मताने पराभव केला.
४. प्रभाग समिती ४ मध्येही सरळ लढत झाली. या ठिकाणी भाजपने उषा पाटील तर भाजप बंडखोरांकडून शेख हसीना यांना संधी देण्यात आली होती. शेख हसीना यांना १० तर उषा पाटील यांना ६ मते मिळाली.
बंडखोरांचा व्हीप भाजपने धुडकावला
या निवडणुकीआधी भाजपच्या बंडखोरांनी नियुक्त केलेले गटनेते ॲड.दिलीप पोकळे व उपगटनेते चेतन सनकत यांनी भाजपच्या सर्व नगरसेवकांना व्हीप बजावून भाजपच्या बंडखोरांना मतदान करण्याचा सूचना दिल्या होत्या. मात्र, भाजपने हा व्हीप अनधिकृत असल्याचे सांगत हा व्हीप धुडकावून लावत भाजपच्याच उमेदवारांना मतदान केले. या निवडणुकीत भाजपचा पराभव झाल्यामुळे महापौर, उपमहापौरानंतर प्रभाग समित्यांचे सभापतीपदही भाजपच्या हातातून गेल्या आहेत.
विनाअडथळा ऑनलाइन निवडणूक पार पडली
ऑनलाइन पद्धतीने निवडणूक होणार असल्याने, या निवडणुकीला अनेक अडचण येतील, अशी शक्यता होती. मात्र, नगरसचिव सुनील गोराणे व त्यांच्या विभागातील कर्मचाऱ्यांनी केलेल्या नियोजनामुळे ही निवडणुकीत विनाअडथळा पार पडली. ज्या अडचणी महापौर व उपमहापौर पदाच्या निवडणुकीदरम्यान आल्या होत्या. त्या वेळेस निर्माण झाल्या नाहीत.