पिस्तूलचा धाक दाखवून चौघांना लुटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2019 07:14 PM2019-11-27T19:14:10+5:302019-11-27T19:14:16+5:30
अमळनेर : चारचाकीला दोन मोटरसायकलवरील सहा जणांनी अडवून पिस्तूलचा धाक दाखवून चौघांना २० हजार रुपये रोख व चार मोबाईल ...
अमळनेर : चारचाकीला दोन मोटरसायकलवरील सहा जणांनी अडवून पिस्तूलचा धाक दाखवून चौघांना २० हजार रुपये रोख व चार मोबाईल लुटून नेल्याची घटना २६ रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास अमळनेर-धुळे रस्त्यावर जानवे डांगर गावाजवळ घडली.
विजय मगन सोनवणे कर अधिकारी रा धुळे, दीपक कैलास नांद्रे रा.धुळे, डॉ.व्यंकट गोविंद मेकाळे रा.नवी मुंबई, अनिल रमेश वळवी रा.रायपूर, ता.नवापूर जि.नंदुरबार हे चारचाकी क्रमांक एमएच-१९ बीयू-२१४४ वरून अमळनेर येथून रात्री साडे दहाच्या सुमारास पैलाड येथून धुळ््याकडे निघाले. जानवेपासून १ किमी अंतरावर डांगर गावाजवळ दोन मोटरसायकलवर सहा तरुणांनी आपल्या मोटारसायकली आडव्या केल्या. त्यातील एकाने हातातील पिस्तुल त्यांच्या दिशेने रोखले व काच उघडण्यास सांगत असताना काळ्या रंगाचा कोट घातलेल्या तरुणाने सात ते आठ किलोचा दगड काचेवर मारून गाडीच्या खिडकीची काच फोडली. त्यात विजय सोनवणे यांच्या हाताला व मांडीला जखम झाली. चोरांनी धमकी देत सोनवणे यांच्याकडील ५ हजार रुपये व एक मोबाईल, नांद्रे यांच्याकडील चार हजार व मोबाईल, डॉ.मेकाळे यांचे ९ हजार व मोबाईल, वळवी यांचे तीन हजार व १ मोबाईल असा एकूण २१ हजारांसह चार मोबाईल हिसकावून पळून गेले. घटनेचे वृत्त कळताच पोलिस निरीक्षक अंबादास मोरे व पोलिसांनी यांनी धाव घेतली. मात्र आरोपी मिळून आले नाहीत.
दरम्यान, घरफोडीत दोन मोटारसायकली व सहा तरुण आणि दरोड्यातदेखील तशीच स्थिती असल्याने व पारोळा येथील गोळीबाराच्या घटनेशी अमलनेरचा संबंध असल्याने स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस अधिकारी स्वप्नील नाईक, सुधाकर लहारे, रामचंद्र बोरसे, नारायण पाटील, राजेश मेंढे यांनी घटनास्थळी भेटी देऊन आरोपींच्या शोधासाठी वेगवेगळ्या ठिकाणी रवाना झाले आहेत.
अमळनेर पोलीस स्टेशनला दरोड्याचा गुन्हा दाखल झाला असून तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अंबादास मोरे करीत आहेत.