रेल्वे गार्ड मारहाणप्रकरणी ऑल इंडिया गार्ड असोसिएशन आक्रमक
By सचिन देव | Published: July 10, 2023 08:28 PM2023-07-10T20:28:07+5:302023-07-10T20:28:32+5:30
डीआरएमची यांची घेतली भेट : रेल्वे पोलिसांवर कारवाई करा, अन्यथा न्यायालयात जाण्याचा इशारा
जळगाव : जनता एक्स्प्रेसमध्ये गार्ड व रेल्वे सुरक्षा बलाच्या कर्मचाऱ्यांमध्ये झालेल्या हाणामारीच्या घटनेनंतर रेल्वेची ऑल इंडिया गार्ड असोसिएशनने आक्रमक पवित्रा घेतला आहे. गार्डला झालेल्या मारहाणीचा निषेध करित, असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी भुसावळ विभागाचे डीआरएम एस. एस. केडिया यांची भेट घेऊन, सुरक्षा बलाच्या कर्मचाऱ्यांवर कडक कारवाईची मागणी केली आहे. अन्यथा न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे.
बिहारहून मुंबईकडे जाणाऱ्या अपच्या जनता एक्स्प्रेसमध्ये (गाडी क्रमांक १३२०१) शनिवारी मध्यरात्री गार्ड व रेल्वे सुरक्षा बलाच्या कर्मचाऱ्यांमध्ये तुफान हाणामारीची घटना घडली होती. या घटनेत गार्ड रजनीकांत डे यांना दुखापत झाल्याने त्यांच्यावर भुसावळ रेल्वे रूग्णालयात उपचार सुरू आहेत. सोमवारी भुसावळ डीआरएम एस. एस. केडिया यांनी रूग्णालयात जाऊन, या गार्ड कर्मचाऱ्याची भेट घेतली. तसेच घडलेल्या प्रकाराचीही माहिती जाणून घेतली. या घटनेनंतर ऑल इंडिया गार्ड असोसिएशन ही संघटना चांगलीच आक्रमक झाली आहे. या संघटनेने रेल्वे पोलिसांवर कारवाईच्या मागणीसाठी रेल्वे मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार केली असल्याचे सुत्रांनी सांगितले.
कारवाई न झाल्यास न्यायालयात जाण्याचा इशारा
ऑल इंडिया गार्ड असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी डीआरएम एस. एस. केडिया यांची भेट घेऊन, रेल्वे गार्डची कुठलीही चुक नसताना, विनाकारण रेल्वे पोलिसांनी मारहाण केली आहे. ते तीन पोलिस असताना, हा गार्ड कसा मारहाण करू शकेल, गार्डने पोलिसांना मारहाण केल्याचा आरोप खोटा आहे. त्यामुळे या प्रकाराची सखोल चौकशी करून, पोलिसांवर कडक कारवाई करावी, लवकर कारवाई न झाल्यास गार्ड असोसिएशन न्याय मिळण्यासाठी न्यायालयात जाईल, असा इशारा ही संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी डीआरएम यांना दिला असल्याचे सूत्रांनी सांगितले.