नगरपंचायत निवडणूक निकाल रद्दसाठी शेंदुर्णीत सर्वपक्षीय मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2018 05:42 PM2018-12-14T17:42:13+5:302018-12-14T17:47:48+5:30
शेंदुर्णी नगरपंचायत निवडणुकीचा निकाल रद्द करून फेरनिवडणूक बॅलेट पेपर अथवा ईव्हीएम व्हीव्ही पॅट मशीन द्वारे मतदान घ्यावे या मागणीसाठी सर्वपक्षीय मूकमोर्चा काढून मुख्याधिकारी राहुल पाटील व सहाय्यक पोलीस निरीक्षक डी.के.सिरसाट यांना निवेदन दिले.
शेंदुर्णी, ता.जामनेर : शेंदुर्णी नगरपंचायत निवडणुकीत ईव्हीएम मशिनच्या माध्यमातून लोकशाहीचा अपमान करून निकाल लागले. या निकालावर सर्व राजकीय पक्षांनी आक्षेप घेत नगरपंचायत निवडणुकीचा निकाल रद्द करून फेरनिवडणूक बॅलेट पेपर अथवा ईव्हीएम व्हीव्ही पॅट मशीन द्वारे मतदान घ्यावे या मागणीसाठी सर्वपक्षीय मूकमोर्चा काढून मुख्याधिकारी राहुल पाटील व सहाय्यक पोलीस निरीक्षक डी.के.सिरसाट यांना निवेदन दिले.
शेंदुर्णी नगरपंचायत निवडणुकीचा निकाल सोमवार १० रोजी लागला. या निकालावर आक्षेप घेत सर्व राजकीय पक्षांच्या वतीने मूक मोर्चा काढण्यात आला. प्रारंभी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुनील शिंपी, मनसेचे शहराध्यक्ष जितेंद्र जाधव व शिवसेनेचे शहराध्यक्ष संजय सूर्यवंशी यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर सर्वपक्षीय विजयी व पराभूत उमेदवारांनी मूकमोर्चा काढला. मूकमोर्चा शेंदुर्णी बस स्थानक, भोई गल्ली, वाडी दरवाजा, रुपलाल चौक, श्री दत्त चौक, होळी मैदान, इस्लामपुरा, कोळीवाडा, कुमावत गल्ली, देशपांडे गल्ली या मार्गाने निघून नगरपंचायतीच्या कार्यालयात आला. यावेळी मुख्याधिकारी व सहायक निवडणूक अधिकारी राहुल पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक डी.के.शिरसाठ यांना सर्व राजकीय पक्षांतर्फे निवेदन देण्यात आले.
शेंदुर्णी नगरपंचायत निवडणुकीत ईव्हीएम मशीनच्या माध्यमातून लागलेल्या निकालाचा निषेध व्यक्त करीत फेरनिवडणूक घेण्यात यावी अशी मागणी केली. तसेच पुढील होणाºया निवडणूक ही बॅलेट पेपर अथवा व्हीव्ही पॅट मशीनच्या माध्यमातून घेण्यात यावे अशी मागणी सर्व राजकीय पक्षाचे उमेदवार, राजकीय पदाधिकारी व गावातील नागरिकांनी केली.