रात्रीच्या संचारबंदीत ‘सब शांती...शांती..’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 04:20 AM2020-12-30T04:20:41+5:302020-12-30T04:20:41+5:30
ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवा प्रकार आढळून आल्याने, कोरोची भीती आधिकच वाढली आहे. त्यामुळे नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर रात्रीच्या वेळी गर्दी ...
ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवा प्रकार आढळून आल्याने, कोरोची भीती आधिकच वाढली आहे. त्यामुळे नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर रात्रीच्या वेळी गर्दी होऊ नये, यासाठी खबरदारी म्हणून राज्य सरकारने ५ जानेवारीपर्यंत महानगरपालिका क्षेत्रात रात्री ११ ते पहाटे ६ पर्यंत संचारबंदी लागू केली आहे. शासनाच्या सूचनेनुसार जिल्हा पोलीस प्रशासनानेही शहरातील सर्व व्यावसायिकांना रात्री नऊपर्यंतच दुकाने सुरू ठेवण्याच्या सूचना केल्या आहेत. रात्री साडेदहापासून शहरात पोलिसांची गस्त सुरू होत आहे. शहरातील नागरिक कारवाईच्या भीतीने संचारबंदीचे पुरेपूर पालन करताना दिसून आले.
१) सिंधी कॉलनी परिसर ते अजिंठा चौफुली चौक
`लोकमत` प्रतिनिधीने रात्री अकरा ते साडेबाराच्या दरम्यान शहरातील विविध भागांची पाहणी केली. यावेळी सिंधी कॉलनी परिसरात पाहणी केली असता, रात्री सव्वाअकराला शांतता दिसून आली. यावेळी परिसरातील काही तरुण रस्त्यालगत गप्पा मारत होते. मात्र, पोलीस गाडी येताच हे तरुण घराकडे पळाले. यावेळी पोलीस गाडी या चौकात पाच मिनिटे थांबून इच्छादेवी चौकाकडे रवाना झाली. तसेच या ठिकाणाहून अजिंठा चौकाकडे येताना रस्त्यावर तुरळक वाहनांचीच गर्दी दिसून आली. तर अजिंठा चौफुलीवरही महामार्गावरील वाहनाव्यक्तिरिक्त इतर परिसरात कडक संचारबंदी दिसून आली. तसेच एमआयडीसी परिसरातही असेच वातावरण दिसून आले.
२) नवीन बसस्थानक ते खोटे नगर स्टॉप
शहरातील अत्यंत वर्दळीचा भाग असलेल्या नवीन बसस्थानकाच्या बाहेर व स्थानकाच्या शेजारील भजे गल्लीतही शांतता हाेती. इतर वेळी या परिसरात रात्री उशिरापर्यंत हॉटेल व चहाचे स्टॉल सुरू असतात. मात्र, आता संचारबंदीच्या काळात रात्री अकरा वाजताच येथील सर्व दुकाने बंद दिसून आली. विशेष म्हणजे बसस्थानकासमोर रिक्षादेखील उभी नव्हती. तसेच या ठिकाणाहून स्वातंत्र्य चौक मार्गे बहिणाबाई उद्यानाकडून खोटे नगर स्टॉपपर्यंत पाहणी केली असता, येथील मुख्य रस्ता व अंतर्गंत रस्तेही निर्मनुष्य दिसून आले.
३) टॉवर चौक, सुभाष चौक, जुने बसस्थानक परिसर
बाजारपेठेचा परिसर असल्याने या ठिकाणींही रात्री उशिरापर्यंत व्यापारी व ग्राहकांची वर्दळ सुरू असते. विशेष म्हणजे बाहेरून येणाऱ्या मालाच्या गाड्यांमुळे रात्री या परिसरात कुठे ना कुठे माणसाची वर्दळ असते. मात्र, सध्या संचारबंदीच्या काळात टॉवर चौक, सुभाष चौक, शनिपेठ किंवा जुन्या बसस्थानक परिसरात एकही दुकान वा चहापानाचा ठेला सुरू असलेला दिसून आला नाही. सर्व रस्त्यांवर शुकशुकाट होता. जुन्या बसस्थानक परिसरात पोलीस कर्मचारी दुचाकीवरून गस्त घालताना दिसून आले.
४) रेल्वे स्टेशन परिसर
सोमवारी रात्री बाराच्या सुमारास रेल्वे स्टेशन समोर रिक्षा व्यतिरिक्त एकही हॉटेल वा चहाची टपरी सुरू नव्हती. रिक्षाचालक रस्त्याच्या बाजूला उभे राहून स्टेशनकडून येणाऱ्या प्रवाशांची वाट पाहात होते. यावेळी रेल्वे पोलीस सुरक्षिततेसाठी स्टेशनच्या बाहेर गस्त घालताना दिसून आले. नेहमी वर्दळ असलेल्या या परिसरात कोकोट संचारबंदी दिसून आली.