सर्व शाळा व अंगणवाड्यांना मार्च अखेरपर्यंत नळजोडणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 05:51 AM2021-02-05T05:51:20+5:302021-02-05T05:51:20+5:30
जळगाव : जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकासह विद्यार्थ्यांना शुद्ध व मुबलक पाणी मिळावे, याकरिता जिल्हा परिषदेच्या दोन हजार ७६४ शाळा व ...
जळगाव : जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकासह विद्यार्थ्यांना शुद्ध व मुबलक पाणी मिळावे, याकरिता जिल्हा परिषदेच्या दोन हजार ७६४ शाळा व तीन हजार ७६ अंगणवाड्यांना मार्चपर्यंत स्वतंत्र नळजोडणी देण्यात येणार असल्याची घोषणा पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी शुक्रवारी केली.
कवयित्री बहिणाबाई चौधरी स्मारकाचे काम लवकरच पूर्ण
जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यांना विकास कामांसाठी या वर्षी पाच लाख रुपये उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्याप्रमाणे, पुढील वर्षाच्या नियोजनातही पाच लाख रुपयांची तरतूद करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे, कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे स्मारकाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात येणार असून, चाळीसगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारण्यासाठी लवकरच बैठक घेण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
विकासकामांचे प्रस्ताव सात दिवसांत पाठवा सर्व यंत्रणांना या वर्षी उपलब्ध करून देण्यात आलेल्या निधीतून जिल्ह्यात विकासाची कामे उभी राहावी, याकरिता सूक्ष्म नियोजन करावे व विकासकामांचे प्रस्ताव सात दिवसांत नियोजन विभागास पाठवावे, असे निर्देश पालकमंत्री पाटील यांनी दिले. शिवाय जिल्ह्यात नदीजोड प्रकल्प राबविण्यासाठी १५ कोटी रुपयांची तरतूद केली आहे.
पुढील आर्थिक वर्षातही पाणंद रस्ते योजना
शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी चांगले रस्ते उपलब्ध व्हावेत, याकरिता जिल्ह्यात शेत पाणंद रस्ते योजना पुढील आर्थिक वर्षातही राबविण्याची मागणी लोकप्रतिनिधींनी बैठकीत केली, त्यासही मान्यता देण्यात आली. जिल्ह्यातील प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना प्राथमिक आजारांवरील औषधे उपलब्ध व्हावी, याकरिता औषधे खरेदीसाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करून दिला जाईल, परंतु रुग्णांना बाहेरून औषधे आणावी लागणार नाहीत. त्याचबरोबर, किरकोळ कारणांसाठी रुग्णांना खासगी रुग्णालयात पाठविले जाणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचनाही त्यांनी केल्यात.
प्रास्तविकात नियोजन समितीचे सदस्य सचिव तथा जिल्हाधिकारी राऊत यांनी जिल्हा नियोजन समितीच्या आराखड्याविषयी माहिती दिली. या बैठकीस आमदार संजय सावकारे, सुरेश भोळे, किशोर पाटील, चिमणराव पाटील, चंद्रकांत पाटील, अनिल पाटील, मंगेश चव्हाण, लता सोनवणे यांच्यासह जिल्हा नियोजन समितीचे सदस्य व जिल्ह्यातील सर्व शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते.