खडसेंसह कन्येच्या निवासस्थानी सर्व सुरळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 04:21 AM2021-08-28T04:21:35+5:302021-08-28T04:21:35+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : भोसरी येथील भूखंड प्रकरणात चौकशी सुरू असलेल्या माजी मंत्री एकनाथ खडसे यांची मालमत्ता अंमलबजावणी ...

All smooth at the bride's residence with Khadse | खडसेंसह कन्येच्या निवासस्थानी सर्व सुरळीत

खडसेंसह कन्येच्या निवासस्थानी सर्व सुरळीत

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : भोसरी येथील भूखंड प्रकरणात चौकशी सुरू असलेल्या माजी मंत्री एकनाथ खडसे यांची मालमत्ता अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) जप्त केल्याची चर्चा सुरू असली तरी या विषयी पोलीस व महसूल प्रशासन अनभिज्ञ आहेत. जळगावातील शिवराम नगर येथील खडसे यांच्या ‘मुक्ताई’ या निवासस्थानासह त्यांची कन्या शारदा चौधरी यांच्या यशवंत नगरातील निवासस्थानाला सील नव्हते. तेथे सर्व काही सुरळीत सुरू असल्याचे पाहणीत दिसून आले.

भोसरी (पुणे) एमआयडीसीतील भूखंडाच्या कथित गैरव्यवहार प्रकरणी ईडीकडून खडसे व त्यांच्या कुटुंबीयांची कसून चौकशी सुरू आहे. त्यांचे जावई गिरीश चौधरी यांना ईडीने अटक केली असून, पत्नी मंदाकिनी खडसे यांनाही ईडीने चौकशीचे समन्स बजावले आहे. प्रकृतीच्या कारणास्तव मंदाकिनी खडसेंनी वेळ मागून घेतला आहे. दुसरीकडे, स्वतः खडसेंची या प्रकरणात दोनवेळा चौकशी झाली आहे. यातच ईडीने खडसेंची लोणावळा आणि जळगावातील सुमारे पाच कोटी ७३ लाखांची मालमत्ता जप्त केल्याची माहिती समोर आली आहे. मात्र ईडीने जप्त केलेल्या मालमत्तेपैकी जळगावातील नेमक्या कोणत्या मालमत्तेचा समावेश आहे, याबाबत ठोस माहिती समोर आलेली नाही.

या संदर्भात शुक्रवारी सकाळी शिवरामनगर येथील खडसे यांच्या निवासस्थानी पाहणी केली असता तेथे सर्व सुरळीत सुरू होते. तेथे त्यांचे कुटुंबीय नव्हते मात्र काम करणारी महिला साफसफाई करीत होती, तर नेहमी सुरक्षेसाठी असलेले पोलीस कर्मचारी तैनात होते. तेथे कोणीही आले नसल्याची माहिती देण्यात आली. दुसरीकडे यशवंतनगरातील खडसे यांच्या कन्येच्या निवासस्थानीदेखील सर्व सुरळीत सुरू होते.

महसूल विभागाकडे माहिती नाही

ईडीने केलेल्या मालमत्ता जप्तीच्या कारवाईसंदर्भात माहिती जाणून घेण्यासाठी महसूल विभाग, पोलीस प्रशासनाकडे विचारणा केली असता या विषयी कोणतीही माहिती त्यांच्याकडे नव्हती. निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांच्यासह जळगावचे तहसीलदार नामदेव पाटील आणि मुक्ताईनगर येथील तहसीलदार श्वेता संचेती यांनी सांगितले की, महसूल विभागाकडे अशा स्वरूपाच्या कारवाईबाबतचे कोणत्याही प्रकारचे पत्र आलेले नाही. जप्त केलेली मालमत्तादेखील आपल्या कार्यक्षेत्रातली नाही, असे त्यांनी सांगितले.

जमीन असल्यास ‘महसूल’ला माहिती

ईडीने शेतजमिनीशी संबंधित मालमत्ता जप्त केली असेल तर अशा स्वरूपाची कारवाई करण्यापूर्वी महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना त्याबाबतचे पत्र दिले जाते. जप्त होणाऱ्या मालमत्तेचा तपशील त्यात असतो. संबंधित मालमत्तेवर महसूल विभागाचा बोजा बसवला जातो, असे तहसीलदार नामदेव पाटील यांनी सांगितले. मात्र, घर, बँकेतील रोकड व इतर ऐवज अशा स्वरूपाची जप्ती असेल तर मात्र ईडी थेट कारवाई करू शकते, असेही महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

Web Title: All smooth at the bride's residence with Khadse

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.