आपल्यात व गिरीश महाजन यांच्यात सर्व आलबेल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2020 12:04 PM2020-01-03T12:04:40+5:302020-01-03T12:04:52+5:30
एकनाथराव खडसे यांचा यू टर्न : मने कधी दुरावलीच नसल्याचा दोघांचा दावा
जळगाव : देवेंद्र फडणवीस व गिरीश महाजन यांच्यामुळे आपले विधानसभेचे तिकीट कापले गेले, असा आरोप करणारे माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी दुसऱ्याच दिवशी यू टर्न घेत माझ्यात व गिरीश महाजन यांच्यात सर्व आलबेल आहे, असे सांगून आपण फडणवीस व महाजन यांच्यावर आरोप केले नसल्याचे सांगितले. या सोबतच आमची मने कधी दुरावलीच नाही, तर मनोमिलनाचा प्रश्नच येत नाही, असे स्पष्टीकरण माजी मंत्री गिरीश महाजन यांनी केले.
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी मंत्री गिरीश महाजन यांना माझी राजकीय कारकीर्द संपुष्टात आणायची होती, असा आरोप खडसे यांनी बुधवारी केला होता. त्यावर गिरीश महाजन यांनी गुरुवारी दुपारी जामनेरात आपल्या निवासस्थानी पत्रकारांशी संवाद साधत खडसे यांच्या आरोपात तथ्य नसून त्यांनी चुकीच्या माहितीच्या आधारे बोलणे संयुक्तीक नाही, असेही महाजन म्हणाले होते. त्यानंतर जळगाव येथे संध्याकाळी जि.प. अध्यक्ष निवडीसंदर्भात भाजपची बैठक झाली. या निमित्ताने खडसे व महाजन एकत्र आले भाजप कार्यालयात ते दोघेही शेजारी-शेजारी बसले होते.
केवळ नाराजी व्यक्त केल्याचे बोललो
खडसे म्हणाले की, फडणवीस व महाजन यांनी तिकीट कापले असो बोललोच नाही तर त्यांनी केवळ नाराजी व्यक्त केली होती, असे सांगितले होते, असा दावा खडसे यांनी करीत यू टर्न घेतला.
खडसेंची नाराजी दूर
एकनाथराव खडसे यांनी तिकीट कापल्याचा आरोप केला नव्हता तर त्यांची केवळ नाराजी होती. त्यांच्याशी बोललो असून त्यांची नाराजीही दूर केली आहे, असा दावा गिरीश महाजन यांनी या वेळी केला. आमची मने कधी दुरावली नव्हती, त्यामुळे मनोमिलनाचा प्रश्नच येत नाही, असेही महाजन यांनी सांगत आम्ही नेहमीच सोबत असतो असेही सांगायला दोघे नेते विसरले नाही.