शहरातील तीनही सर्कल ठरताहेत अपघाताचे नवे ‘स्पॉट’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2022 10:11 AM2022-04-20T10:11:33+5:302022-04-20T10:11:51+5:30
Accidents : जळगाव शहरातून जाणाऱ्या महामार्गाचे चौपदरीकरण हे जळगावकरांसाठी चांगलेच अडचणीचे ठरत आहे.
जळगाव : अजिंठा चौफुली आणि इच्छादेवी चौक या चौकांमध्ये याआधीच गंभीर अपघात झाले आहेत. त्यापाठोपाठ आता मंगळवारी आकाशवाणी चौकात अपघात झाला आहे. त्यामुळे हे तीनही सर्कल अपघाताचे नवे स्पॉट ठरत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. अजिंठा चौफुलीला सर्कल बांधले गेल्यावर तेथे अपघात झाला होता. त्यानंतर इच्छादेवी चौकाच्या कामादरम्यानच तेथे अपघात झाला. या सर्व चौकांच्या बाजूने पुरेसा रुंद वळण रस्ता बांधला न गेल्याने हे अपघात होत असल्याचे बोलले जात आहे.
जळगाव शहरातून जाणाऱ्या महामार्गाचे चौपदरीकरण हे जळगावकरांसाठी चांगलेच अडचणीचे ठरत आहे. पाळधी ते तरसोद हे सलग एकाच टप्प्यात केले जाऊ शकणारे काम वेगवेगळ्या कारणास्तव दोन टप्प्यांत करण्यात येत आहे. यातील दुसऱ्या टप्प्याला फक्त तत्त्वत: मान्यता मिळाली आहे. पहिला टप्पा पूर्ण होत नाही तोच त्यातील अनेक चुका समोर येऊ लागल्या आहेत. यात आकाशवाणी चौक, इच्छादेवी चौक आणि अजिंठा चौक येथे तयार करण्यात आलेले रोटरी सर्कल हे जळगावकरांसाठी मोठी डोकेदुखी ठरले आहेत. इच्छादेवी चौकात तयार झालेले सर्कल हे १० मीटर व्यासाचे आहेत आणि त्याच्या बाजूने रस्त्याची रुंदी त्याच्या दीडपट हवी असते. तेवढी पुरेशी रुंदी आणि समांतर रस्ते नसल्याने हे सर्कल अडचणीचे ठरले आहेत. आकाशवाणी चौकातही सर्कल हे तर प्रभात चौकातून येणाऱ्या पुलाच्या उतारापासून ५० मीटर अंतरावरच आहे. त्यामुळे या ठिकाणी अपघात होऊ शकतात, अशी शक्यता वर्तविली जात होती. याआधीही या चौकात किरकोळ अपघात झालेले आहेत.
काय आहेत चौकात समस्या
या चौकात समांतर रस्त्यावर तापी पाटबंधारे महामंडळाची सात मीटरवर लांब भिंत बांधण्यात आली आहे. त्यामुळे हा रस्ता तेवढा अरुंद होतो आणि चौकात वळण घेण्यास कमी जागा मिळते. त्यामुळे या ठिकाणी लहान-मोठे अपघात होतच असतात, तसेच या चौकाच्या आधी असलेल्या प्रभात चौकात अंडरपासवरील पूल नेमका आकाशवाणी चौकाच्या ५० मीटर आधीच संपतो. त्यामुळे उतार असल्याने वाहनांना वेगावर नियंत्रण मिळवण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. चौकात तीन बाजूंनी वाहने लावून ठेवलेली असतात, तसेच प्रवासी वाहतूक करणारेदेखील वाहने रस्त्यावर उभी करतात. त्यामुळे चौक अरुंद होतो. याबाबत काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांनी चौकात वाहने उभी राहू न देण्याचे निर्देश दिले होते. मात्र, तरीदेखील चौकात प्रवासी वाहने उभी राहतात.