सुरक्षेचे किट उपलब्ध असताना वापर न झाल्याने गेला तिघांचा जीव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 04:14 AM2021-05-17T04:14:01+5:302021-05-17T04:14:01+5:30

ऑन द स्पाॅट रिपोर्ट सुनील पाटील जळगाव : समृद्धी केमिकल्स या रासायनिक खतनिर्मिती करणाऱ्या कंपनीत मळ पंप, हेल्मेट, सुरक्षा ...

All three died when the safety kit was not used while it was available | सुरक्षेचे किट उपलब्ध असताना वापर न झाल्याने गेला तिघांचा जीव

सुरक्षेचे किट उपलब्ध असताना वापर न झाल्याने गेला तिघांचा जीव

Next

ऑन द स्पाॅट रिपोर्ट

सुनील पाटील

जळगाव : समृद्धी केमिकल्स या रासायनिक खतनिर्मिती करणाऱ्या कंपनीत मळ पंप, हेल्मेट, सुरक्षा किट व मास्क आदी सुरक्षेविषयी साहित्य उपलब्ध होते, मात्र तरी देखील कामगारांना ते पुरविण्यात आले नाहीत. ही सामग्री पुरविली असती तर कदाचित तिघांचा जीव वाचला असता. दरम्यान,मयूर विजय सोनार व त्याचे मेहुणे दिलीप अर्जुन सोनार या दोघांचा कंपनीने दहा लाख रुपयांचा विमा काढलेला आहे. ती भरपाई मिळवून देण्याची जबाबदारी कंपनीने घेतली आहे तर दुसरे मयत कंत्राटदार रवींद्र कोळी यांनाही कंपनीमार्फत मदत दिली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

सांडपाणी व वेस्टेज केमिकल्स साठविण्याची टाकी स्वच्छ करीत असताना त्यात बुडून रवींद्र उर्फ गोटू झगडू कोळी (३२,रा. चिंचोली, ता.यावल), मयूर विजय सोनार (३५, रा. कांचन नगर) व दिलीप अर्जुन सोनार (५४, रा. कांचन नगर, मूळ रा.पाल, ता.रावेर) या तिघांचा एका पाठोपाठ मृत्यू झाल्याची घटना एमआयडीसीतील समृद्धी केमिकल्स या कंपनीत शनिवारी दुपारी साडेबारा वाजता घडली होती.

दरम्यान, या घटनेप्रकरणी कंपनी मालक सुबोध सुधाकर चौधरी, हिरा सुबोध चौधरी, अपर्णा सुयोग चौधरी, सुनील सुधाकर चौधरी व सुयोग सुधाकर चौधरी या पाच जणांविरुद्ध सदोष मनुष्यवध कलम ३०४ अन्वये एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण पाटील हे सरकार कडून फिर्यादी झालेले आहेत. दरम्यान सुबोध, सुनील व सुधाकर या तिघे भावंडांना रविवारी सायंकाळी अटक करण्यात आलेली आहे.

तीस वर्षांपासून सुरू आहे कंपनी

जुन्या एमआयडीसीतील समृद्धी केमिकल्स ही कंपनी तीस वर्षांपासून सुरू आहे. शेतीसाठी लागणारे रासायनिक खत निर्मिती या कंपनीतून केली जाते. महाराष्ट्र तसेच महाराष्ट्राच्या बाहेर खतपुरवठा या कंपनीतून केला जातो. रासायनिक खतांची निर्मिती होत असल्याने तेथे रसायनाचा वापर येतोच, त्यामुळे कंपनीसाठी लागणाऱ्या सर्व आवश्यक परवानगी घेण्यात आलेल्या आहेत, अशी माहिती कंपनी मालकांचे नातेवाईक अमोल चौधरी व सौंदर्या चौधरी यांनी 'लोकमत' जवळ दिली. कामगारांना आवश्यक त्या सुविधा व सुरक्षेविषयी साहित्यदेखील उपलब्ध करून देण्यात आले नाही. कामगारांनी या साहित्याचा वापर केला नाही की मालकांनी त्यांना साहित्य दिले नाही हा चौकशीचा भाग असला तरी कंपनीच्या हलगर्जीपणामुळेच तिघांचा मृत्यू झालेला असल्याचे स्पष्ट झाले आहे. औद्योगिक सुरक्षा विभागाकडून देखील कंपनीची तपासणी झालेली नसल्याचे सांगण्यात येत आहे.

मळ पंपाद्वारे टाकी स्वच्छ करणे अपेक्षित

ज्या टाकीत पडून तिघांचा मृत्यू झाला त्या टाकीला लागून मळ पंप आहे. तर त्याला लागून आणखी एक दुसरी लोखंडी टाकी तेथे आहे. मळ पंप जमिनीतील टाकीत टाकून त्याद्वारे दुसऱ्या टाकीत ही घाण काढणे अपेक्षित आहे. टाकीत उतरण्याची आवश्यकताच नसते, असे असतानाही मालकांनी कामगारांना टाकीत उतरवून ती साफ करण्याचे सांगितले होते, असे देखील समोर आलेले आहे.

शालक व मेव्हुण्याची काही मिनिटांच्या फरकाने अंत्ययात्रा

शनिवारी रात्री साडेनऊ वाजता मयूर सोनार यांची कांचन नगरातून अंत्ययात्रा काढण्यात आली. त्यानंतर थोड्याच वेळाने मेहुणे दिलीप सोनार यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. काही मिनिटांच्या फरकाने शालक व मेहुणे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. हा प्रसंग पाहून संपूर्ण कांचन नगरात हळहळ व्यक्त केली जात होती. रवींद्र कोळी यांचा मृतदेह मूळ गावी नेण्यात आल्याचे सांगण्यात आले. मुलगा व जावई यांचा एकाच वेळी असा दुर्दैवी मृत्यू झाल्याने मयूरच्या आईने प्रचंड आक्रोश केला होता.

मदतीसाठी घेतली बैठक

या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर मृत झालेल्या कामगार व कंत्राटदाराला कंपनीकडून अर्थसहाय्य मिळावे यासाठी मृताचे नातेवाईक व कंपनी मालक यांच्यात बैठक झाली. त्यात मयूर व दिलीप सोनार या दोघांचा कंपनीने दहा लाख रुपयांचा विमा काढलेला आहे. ही रक्कम मिळवून देण्याची जबाबदारी कंपनीने घेतली तर कंत्राटदारांना काही रक्कम कंपनीकडून दिली जाणार आहे.

कंपनीत फक्त एक व्यक्ती हजर

लोकमत प्रतिनिधीने रविवारी दुपारी कंपनीत जाऊन पाहणी केली असता तेथे प्रवेशद्वाराजवळ फक्त एक व्यक्ती बसलेला होता सुरक्षारक्षकांच्या कॅबिनमध्ये कुणीही नव्हते. कंपनीचे उत्पादन थांबविण्यात आले होते. पत्रकार आल्याची माहिती मिळाल्यानंतर सुमोल चौधरी व सौंदर्या चौधरी हे कंपनीत दाखल झाले. कंपनीतील इतर विभाग बंद होते. इथे बाहेरील व्यक्तीस येण्यास पोलिसांनी मनाई केली आहे असे सांगण्यात आले. कंपनी सिल केल्याची चर्चा होती, मात्र तसा प्रकार नव्हता.

Web Title: All three died when the safety kit was not used while it was available

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.