अल्लाउद्दीन खिल्जीच्या आक्रमणाच्या ‘जखमा’ खान्देशातही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2018 08:50 PM2018-02-03T20:50:56+5:302018-02-04T00:48:20+5:30
महाराष्टवर हल्ला करणारा अल्लाउद्दीन खिल्जी हा पहिला मुस्लिम शासक होता. त्यानेच देवगिरी साम्राज्यावर आक्रमण करून, तो अभेद्य किल्ला जिंकला होता. त्याच अल्लाउद्दीन खिल्जीच्या आक्रमणाच्या जखमा या खान्देशात देखील आजही कायम आहेत.
- अजय पाटील
जळगाव : सध्या ‘पद्मावत’ चित्रपटामुळे राणी पद्मावती, चित्तोडचा राजा रावलरतन सिंह व दिल्लीच्या सुलतान अल्लाउद्दीन खिल्जी यांचा इतिहास जाणून घेण्यासाठी नागरिक व इतिहासप्रेमींमध्ये प्रचंड उत्सुकता दिसून येत आहे. महाराष्टÑावर हल्ला करणारा अल्लाउद्दीन खिल्जी हा पहिला मुस्लिम शासक होता. त्यानेच देवगिरी साम्राज्यावर आक्रमण करून, तो अभेद्य किल्ला जिंकला होता. त्याच अल्लाउद्दीन खिल्जीच्या आक्रमणाच्या जखमा या खान्देशात देखील आजही कायम आहेत.
जळगाव जिल्ह्यातील सातपुडापर्वताच्या पायथ्याशी असलेल्या मनुदेवी मंदिर परिसरात असलेला ‘गायवाडा’ हा अल्लाउद्दीन खिल्जी व त्याचा सेनापती मलीक गफुरच्या आक्रमणाच्या जखमा घेवून, शेवटच्या घटका मोजत आहे. तर नंदुरबार जिल्ह्यातील शहादापासून १० कि.मी.अंतरावर असलेल्या सुल्तानपुर येथे देखील अल्लाउद्दीन खिल्जीच्या सैन्याने प्रचंड लुट करून जैन राजाचा पराभव केला असल्याचा उल्लेख इतिहासात आहे. देवगिरी किल्ल्यावर आक्रमण करायला येत असताना, अल्लाउद्दीन खिल्जीने खान्देशात लुट केली होती की, देवगिरी जिंकून ही लुट केली याबाबत इतिहासात स्पष्ट उल्लेख करण्यात आलेला नाही.
गायवाड्याचे आजही अस्तित्व कायम
१. सातपुडा परिसरात असलेल्या मनुदेवी मंदिराच्या वरच्या भागात ईश्वरसेन गवळी यांनी १२४८ ते १२५२ दरम्यान गायवाडा किल्ला बांधला होता. गोपालक असल्याने त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात गायी असल्याने या किल्लयाचे नाव ‘गायवाडा’ ठेवण्यात आले होते. अल्लाउद्दीन खिल्जी हा दिल्लीचा सुल्तान जल्लालुद्दीन यांचा जावई व त्यांच्या सेनापती होता.
२.बिहारमधील कारा या ठिकाणाहुन जल्लालुद्दीन यांना न सांगताच अल्लाउद्दीन खिल्जीने देवगिरी किल्लयावर ८ हजार भरवश्याचे सैनिक घेवून हल्ला केला होता. त्यापुर्वी जे-जे लहान राज्य त्यांच्या मार्गात आले, त्यात त्याने प्रचंड लुट केली. १२९७ च्या काळात अल्लाउद्दीन खिल्जीचा सेनापती व खास विश्वासु असलेला मलीक गफुर याने संपत्ती व रसदसाठी गायवाडा येथे हल्ला केला. सैन्यशक्ती कमी असल्याने गवळी राजांचा त्यावेळी पराभव झाला होता.
३. खिल्जी व मलीक गफुरच्या आक्रमणानंतर गवळी साम्राज्य लयास गेले. मात्र, आजही मनुदेवी मंदिराच्या वरच्या भागात असलेल्या पहाडवर गायवाडा व गवळी राजाच्या किल्लयाचे अस्तित्व आजही दिसून येते. काही तुटलेल्या भिंती, ढासळलेले बुरुज आजही गायवाड्याचा इतिहास सांगतात. अनेक इतिहासप्रेमी, गिरीप्रेमी या ठिकाणी भेट देत असतात.
सुल्तानपुरातही केली होती प्रचंड लूट
बिहार व मध्यप्रदेशातील कारा येथून येताना विंध्य पर्वत ओलांडून नंदुरबार जिल्'ातील सुल्तान पुरात प्रवेश केला होता. असे काही इतिहास अभ्यासकांचे मत आहे. त्या ठिकाणी सुल्तानपुरचे नाव वेगळे होते. सुल्तानपुर पुरगन्यात तेव्हा एका जैन राजाचे राज्य होते. त्या ठिकाणी देखील खिल्जीच्या आदेशाने मलीक गफुरने आक्रमण करून लुट केली होती. या ठिकाणाहूनच त्याने देवगिरीकडे कुच केली असल्याचे मत इतिहासकारांचे आहे. त्याचा आक्रमणाच्या कोणताही पुरावा आज सुल्तानपुर मध्ये दिसून येत नाही. मात्र खिल्जी जेव्हा महाराष्टÑात आला, तेव्हा त्याचा सामना खान्देशातील राजांनीच केला असल्याचे दिसून येत आहे.
देवगिरी किल्ला जिंकल्यानंतर येथील राजाने खिल्जीला वार्षिक खंडणी द्यावयाचा करार करण्यात आला. मात्र एका वर्षी देवगिरीच्या राजाने खंडणी देण्यास नकार दिल्याने मलीक गफुरने देवगिरीवर पुन्हा हल्ला केला होता. त्याचवेळी गफुरने गवळी राजाच्या किल्लयावर हल्ला करुन त्या ठिकाणी लुट केली होती.
-रामचंद्र पाटील, इतिहास अभ्यासक
मध्यप्रदेशमधुन अल्लाउद्दीन खिल्जीने देवगिरीवर हल्ला करण्याआधी त्याचा सेनापती मलीक गफुरला आदेश देवून, काही भाग लुटला होता. त्याचवेळी शहादापासून १० किमी असलेल्या सुल्तानपुरवर हल्ला केला होता. त्यावेळी सुल्तानपुरचे वेगळे नाव होते. गफुरने हा भाग जिंकल्यानंतर त्याचे नाव सुल्तानपुर असे दिले आहे.
-सर्जेराव भामरे, इतिहास अभ्यासक