इसमाच्या मृत्यूवरुन आरोप-प्रत्यारोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2019 09:15 PM2019-11-03T21:15:45+5:302019-11-03T21:16:19+5:30
शवविच्छेदनासाठी मृतदेह धुळ्याला रवाना
जळगाव : हरीविठ्ठल नगरातील सुरेश भास्कर नाडे (४३) यांचा रविवारी सकाळी अचानक मृत्यू झाला. त्यांचा मृत्यू संशयास्पद असल्याचा आरोप नातेवाईकांनी केल्याने जिल्हा रुग्णालयात वाद निर्माण झाला होता. दरम्यान, मृत्यचे कारण स्पष्ट व्हावे व शवविच्छेदन इनकॅमेरा व्हावे यासाठी मृतदेह धुळे येथे वैद्यकिय महाविद्यालयात पाठविण्यात आला. सध्या या घटनेची अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
हरिविठ्ठल नगरातील तडवी गल्लीत सुरेश नाडे, पत्नी अंजली, शुभम व शुभांगी अशी दोन मुले या कुटुंबियांसोबत वास्तव्यास होते. हातमजुरी करुन ते उदरनिर्वाह भागवित होते. २००५ मध्ये त्याचा पहिल्या पत्नीसोबत घटस्फोट झालेला आहे. तर अंजली हिचाही घटस्फोट झाला आहे. दोघेही प्रेमप्रकरणातून जवळ आले. लग्न न करताच एकत्र राहत होते, अशी माहिती त्याच्या नातेवाईकांनी दिली. शनिवारी रात्री सुरेश नाडे यांची अचानक तब्येत बिघडली. सकाळी पुन्हा ते जमीनीवर कोसळले. बेशुध्दावस्थेतील वडीलांना बघून शुभांगीने सुरेशचे भाऊ अजय विनोद नाडे यांना माहिती दिली. त्यानुसार अजय धावतच घरी पोहचला. त्याने तत्काळ इतरांच्या मदतीने त्याला जिल्हा रुग्णालयात हलविले. याठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सुरेश नाडे यांना मृत घोषित केले.
पती-पत्नीमध्ये नेहमी भांडण व्हायचे
घटस्फोटीत अंजली हिला प्रेमसंबंधांतून घरात आणले. लग्न न करतातच दोघेही एकत्र रहायला लागले. त्यांना दोन मुले आहेत. यादरम्यान अंजली व सुरेश या दोघा पत्नीमध्ये नेहमी भांडणे व्हायचे. या भांडणातून अंजली पती सुरेश यांना मारहाण करायची, अशाचप्रकारे भांडणातून अंजलीने केलेल्या मारहाणीतून सुरेश नाडे यांचा मृत्यू झाल्याचा आरोप अजय वाडे, विनोद नाडे यांच्यासह नातेवाईकांनी केला
पोलीस ठाण्यातही वाद
मृतदेह जिल्हा रुग्णालयात सोडून काही नातेवाईकांनी रामानंदनगर पोलीस ठाणे गाठले. पोलीस निरीक्षकांची भेट घेवून इनकॅमेरा शवविच्छेदनाची मागणी केली. कर्मचारी संभाजी पाटील, ललीत भदाणे यांची जिल्हा रुग्णालय गाठले. नातेवाईकांच्या मागणीनुसार मृतेदह धुळे हलविण्यासाठी आवश्यक कागदोपत्री प्रक्रिया पार पाडली. नाडे याच्या डोळ्याजवळ सुज असून अंगावर इतरही मारहाणीच्या जखमा असल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे. जिल्हा रुग्णालयात महिलांसह नातेवाईकांनी गर्दी केली. दुपारी २ वाजेच्या सुमारास वाडे याचा मृतदेह रुग्णवाहिकेतून धुळ्याकडे हलविण्यात आला.