मनपातील सत्ताधाऱ्यांच्या नियोजनाअभावी जळगावकरांना त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2019 12:41 PM2019-08-04T12:41:46+5:302019-08-04T12:42:12+5:30
नगरसेवकांनाही धरले जबाबदार
जळगाव : मनपातील सत्ताधाऱ्यांच्या नियोजनाअभावी अमृत योजनेच्या कामाचा शहरवासीयांना त्रास सहन करावा लागत असून मनपातील ९० टक्के कर्मचारी हे नगरसेवकांचे नातेवाईक असल्याने ते कामे करीत नाही व त्यामुळेच शहरात साफसफाईदेखील होत नाही. त्यामुळे जळगावकरानां त्रास सहन करावा लागत आहे, असा आरोप शहरवासीयांनी रोटरी क्लब जळगाव वेस्टतर्फे आयोजित चर्चासत्रात केला. दरम्यान, या वेळी महामार्ग प्राधिकरणाचे (नही) प्रकल्प संचालक सी.एम. सिन्हा हे या वेळीही हजर नसल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली. महापौर सीमा भोळे यादेखील या वेळी उपस्थित नव्हत्या.
जळगावकरांच्या त्रासाला जबाबदार कोण? या विषयावरील चर्चासत्राच्या दुसºया भागाचे आयोजन शनिवार ३ रोजी दुपारी मायादेवी नगरातील रोटरी भवनात करण्यात आले होते. त्यावेळी मनपाच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त करीत शहरवासीयांच्या त्रासाचे खापर मनपावर फोडले. या सोबतच वाहतूक शाखेच्या कारभारामुळे अपघात होत असल्याचाही आरोप करण्यात आला.यात आमदार सुरेश भोळे, माजी महापौर नितीन लढ्ढा, शहर वाहतूक अधीक्षक देवीदास कुनगर हे सहभागी झाले होते.
अमृत योजनेवरून प्रश्नांची सरबत्ती
शहरात सुरु असलेल्या अमृत योजनेच्या कामामुळे शहरवासीय वेठीस धरले जात असून त्यामुळे सर्वच जण त्रस्त असल्याने या योजनेच्या मुद्यांवरूनच प्रश्नांची सरबत्ती करण्यात आली. यामध्ये ज्या भागात खोदकाम केले जाणार आहे, तेथे पूर्व सूचना दिली जावी, अशी अपेक्षा आहे. मात्र तसे होत नसल्याने त्या-त्या भागातील रहिवाशांना त्रास सहन करावा लागतो. शिवाय पाईप टाकल्यानंतरचे कामे व्यवस्थित होत नसल्याने पावसाळ््यात मोठी कसरत करावी लागत असल्याचा आरोप या वेळी करण्यात आला.
अमृतचे काम करताना केवळ रिंगरोडवर दबाई करण्यात आली. शहरातील इतरही भागाचा त्यासाठी विचार केला जावा, असे या वेळी सूचविण्यात आले. यावर रिंग रोडवर आपली वैयक्तीक रुची नसल्याचे आमदार सुरेश भोळे म्हणाले. यासाठी शहरातील सर्व ठिकाणी तसे कामे करण्याचा सूचना देऊ अशी ग्वाही त्यांनी दिली. काही जणांनी अमृत योजना अयशस्वी ठरू पाहत असल्याचा आरोप केला.
हुडको व गाळ्यांचा प्रश्न सुटल्यास सर्व प्रश्न मार्गी - आमदार सुरेश भोळे
आमदार म्हणाले की, अमृत योजनेसाठी मोठा निधी उपलब्ध झाला असून काही तांत्रिक अडचणी, पावसाळ्यात डांबरीकरण अशक्य, मुरुममुळे चिखल अशा समस्यांवर मात करीत हे काम वेगाने करण्याचा प्रयत्न आहे. शहरातील ७० टक्केखड्डे बुजवण्यात आले आहे. स्वच्छ भारत योजनेतून नवीन घंटा गाड्यांंद्वारे शहर कचरा मुक्त करणार असल्याची ग्वाही दिली. समांतर रस्त्यांचे काम ही लवकरच मार्गी लागेल असे सांगून शिवाजीनगर पुलाचे काम ५० टक्के पूर्ण झाले असून पिंप्राळा उड्डाणपुलासाठी निविदा प्रक्रिया पूर्ण होत असल्याचेही ते म्हणाले. शहरातील बहुतांश प्रश्न मार्गी लागत असून आता हुडकोची कर्जफेड व गाळ्यांचा प्रश्न सोडविण्यास प्राधान्य देणार असून हे दोन्ही प्रश्न सुटल्यास शहरातील सर्व समस्या मार्गी लागतील, असा विश्वास व्यक्त केला.
संपर्क कार्यालय २४ तास खुले
शहरातील प्रश्न सोडविण्यासाठी नागरिकांनी त्यांचा सहभाग, सूचना, सहकार्य व सकारात्मक विचारांसह वेळ देऊन या कार्यात सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले. त्यासाठी आमदारांचे जनसंपर्क कार्यालय व महापौरांचे कार्यालय २४ तास जनतेसाठी खुले असून कोणत्याही नागरिकाने त्यांच्या समस्येसाठी मोबाईलवर अथवा व्हॉटस् अॅपने संपर्क करावा असे आवाहन केले. त्यांनी यावेळी शहरातील विकास कामांसाठी मिळालेल्या विविध योजनांच्या माध्यमातून ८९१ कोटी रुपये प्राप्त झाल्याची माहिती सादर केली. नागरिकांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देत अमृत योजनेंच्या मक्तेदारांनाही कार्यक्रमातच आवश्यक त्या सूचना दिला.
सत्ताधाºयांनी कार्यपद्धती बदलावी - नितीन लढ्ढा
माजी महापौर नितीन लढ्ढा यांनी नकारात्मक नव्हे तर सकारात्मक चर्चेने विकासाचा विचार करु या, सत्ताधाºयांकडे नियोजन व समन्वयाचा अभाव असून प्रशासन तेच आहे मात्र त्यांच्याकडून काम करुन घेण्यासाठी सत्ताधाºयांनी कार्यपद्धती बदलली पाहिजे असे सांगितले. ३५ वर्षात विकास कामे करताना आम्हालाही अडचणी आल्या, विरोधाला आम्हीही तोंड दिले. तुमच्याकडे मोठे सैन्य असूनदेखील त्यांना दिशा नाही. प्रशासन सत्ताधाºयांच्या वेठीस असते मात्र विरोधकांनाही बोलण्याची संधी दिली पाहिजे असे लढ्ढा यांनी सांगून अमृत योजनेबाबत प्रशासन व मक्तेदार यांच्यात समन्वय घडविण्यात सत्ताधारी अपयशी ठरले होते परंतु आता शहराच्या विकासाच्या दृष्टीने आम्ही सर्व एकत्र येत यावर मात केली आहे. नागरिकांनी सत्य कायआहे ते जाणून महापालिकेस सहकार्य करावे आम्ही विकासासाठी सत्ताधाºयांच्या सोबत असल्याचे सांगितले.
‘ते’ वाहन अवजड नव्हते
वाहतूक पोलीस निरीक्षक देविदास कुनगर यांनी वाहतुकीविषयी माहिती देऊन सर्व राष्ट्रीय महामागार्चा सर्वे करुन उपाययोजनांसाठी विविध विभागांसमवेत बैठका घेवून अपघात होवू नये म्हणून प्रयत्न केल्याचे सांगितले.
उद्योजक अनिल बोरोले यांच्या अपघातास कारणीभूत ठरलेले वाहन अवजड वाहनात येत नसल्याचे देविदास कुनगर यांनी सांगितले. तसेच या अपघातानंतर तेथे वेळीच पोहचून मदत केल्याचे त्यांनी सांगितले.
ज्या ठिकाणी रस्त्यांवर वाहने उभी केली जातात, त्याठिकाणी पोलीस कर्मचाºयांची नियुक्ती करून कारवाई केली जाईल, तरीदेखील नियमांचे पालन होत नसेल तर त्यांचा वाहन परवाना निलंबित करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला.
‘लोकमत’चा उल्लेख
रात्री येणाºया प्रवाशांची रिक्षा चालकांकडून लूट केली जात असल्याने त्यांना गणवेश ठरवून द्यावा, अशी मागणी अनिल अडकमोल यांनी केली. प्रवाशांना होणाºया त्रासाबद्दल ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केल्याचाही उल्लेख अडकमोल यांनी केला.
शहरातील अनेक चौकात वाहतूक पोलीस हजर नसल्याने व सिग्नल बंद राहत असल्याने अपघातांचे प्रमाण वाढत असल्याचा आरोप या वेळी करण्यात आला. या सोबतच शिवाजीनगर उड्डाणपूल, सुभाष चौकातील हातगाडी, अवजड वाहनांचे अतिक्रमण, पोलिसांकडून होणारी अरेरावी, मेहरुण तलावाचे कामे या विषयीदेखील प्रश्न उपस्थित झाले.