युती -आघाडीत आरोपांच्या फैरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2019 12:42 PM2019-04-19T12:42:04+5:302019-04-19T12:42:39+5:30
‘मोदी मोदी..’, ‘चौकीदार चौर है..’ च्या घोषणांनी परिसर दणाणला
जळगाव : मतदानाची तारीख ़जवळ येत असतानाच लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी अधिकच पेटल्याचे दिसत आहे़ याचाच प्रत्यय जळगावातील रोटरी भवनात आयोजित चर्चासत्रात आला़ महायुती व महाआघाडीचे दोन्ही उमेदवार व पक्षांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या जोरदार फैरी झाडल्या गेल्याने वातावरणात तणाव निर्माण झाला होता़ भाजपकडून ‘मोदी-मोदी’ अशा घोषणा देण्यात आल्या तर त्याला राष्ट्रवादीकडून ‘चौकीदार चोर है..’ने प्रत्युत्तर देण्यात आले़ या घोषणांनी परिसर दणाणला होता़ महायुतीकडून उमेदवार आमदार उन्मेष पाटील, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह पदाधिकारी तर महाआघाडीकडून उमेदवार गुलाबराव देवकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते़ दोन तासाच्या या कार्यक्रमात जिल्ह्यासह राष्ट्रीय पातळीवरील मुद्यांवर जोरदार चर्चा झाली़ ‘न्यूज १८ लोकमत’च्यावतीने लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारण नव्हे चर्चा या आमने सामने चर्चासत्राचे आयोजन रोटरी भवनात करण्यात आले होते़ यावेळी कृषी, सिंचन, रोजगार, महिलांचे प्रश्न, यासह विविध मुद्यांवर चर्चा करण्यात आली़ दोनही पक्षांच्या उमदेवारांनी आपापली मते मांडली़ यात गुलाबराव देवकरांपेक्षा आपण पाच वर्षात चार पटीने अधिक कामे केल्याचा दावा आमदार उन्मेष पाटील यांनी केला़ यावर ‘तुम्ही एकतरी ठोस काम सांगा’ असा सवाल गुलाबराव देवकर यांनी केला़ महिलांच्या प्रश्नांवरून राष्ट्रवादीच्या माहिला आघाडीने आक्रमक भूमिका मांडत भाजपने उमेदवारी काढून घेत एका महिलेचा अपमान केल्याची भावना व्यक्त केली़ यावर उमेदवारी कोणाला देणं न देण्ां हा निर्णय पक्षांअर्तगत असतो मात्र, उत्तर महाराष्ट्रात तीन महिलांना उमेदवारी देऊन भाजपनेच खरा महिलांचा सन्मान केल्याचा दावा भाजपकडून करण्यात आला़ सिंचनाच्या प्रश्नावरून जोरदार खडाजंगी झाली़ मित्रपक्षाच्या आमदारांना आंदोलने करावी लागतात असे सांगत हे सरकार शेतकऱ्यांप्रती असंवेदनशील असल्याचा आरोप राष्ट्रवादीकडून झाला़ यावर आंदोलन हा माझा मूळ स्वभाव आहे़ तेव्हा आमदार असताना मी शेतकºयांच्या तक्रारी मांडल्याचे स्पष्टीकरण सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले़ शिवसेना मंत्री खिशात राजीनामा ठेवायचे मात्र तो कधी बघितला नाही, असा टोला राष्ट्रवादीच्या गोटातून झाल्यानंतर परकिय स्त्रीने या देशावर राज्य करून नये या मुद्यावरून स्थापन झालेल्या राष्ट्रवादीला राजीनाम्यांबद्दल बोलायचा कसलाही अधिकार नसल्याचे उत्तर गुलाबराव पाटील यांनी दिले़ जलसंपदा मंत्री जिल्ह्याचे असतानाही एकाही सिंचन प्रकल्पाचे ठोस काम झाले नसल्याचा आरोप राष्ट्रवादीकडून झाला यावर आतापर्यंतचा सर्वाधिक निधी सिंचनासाठी भाजप सरकारच्या काळात आल्याचे उन्मेष पाटील यांनी सांगितले़ उमेदवारी बदलण्याच्या मुद्यावरून शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या भुसावळ येथील सभेची आठवण करून देत उमेदवारी बदलायला हिंमत लागते. असा टोला पाटील यांनी मारला. यावर जीगर नाही तर महिलांच्या सन्मानाचा प्रश्न असल्याचे प्रत्युत्तर गुलाबराव देवकर यांनी दिले़